नवी दिल्ली, दि. १० – अरविंद केजरीवाल यांना अनार्किस्ट म्हणवून घेण्यात रस असेल तर त्यांनी नक्षलींमध्ये सहभागी व्हावी सभ्य दिल्लीत राहू नये असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम आदमी पार्टीच दिल्ली निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी असल्याचे सूचित केले. आम आदमी पार्टीचं प्रभुत्व धरण्यांमध्ये, आंदोलनांमध्ये आणि विरोधामध्ये असल्याचे उपहासात्मक शैलीत सांगत ज्याला जे काम जमतं ते त्याला द्यावं असं आवाहन मोदींनी केलं. चांगला गाडी चालवतो त्याला गाडी चालवायला द्यावी त्याप्रमाणे चांगल्या आंदोलकांना विरोधात बसवा आणि आम्ही चांगलं सरकार चालवतो त्यामुळे आम्हाला दिल्लीत सत्ता द्या असं मोदी म्हणाले.
नवी दिल्लीमध्ये जनरेटरचं राज्य संपवणार आणि २४ तास वीज पुरवणार असं आश्वासन देतानाच वेगवेगळ्या वीज कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण करत मोबाईलप्रमाणे सेवा देणारी वीज कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकाला असेल असं मोदी म्हणाले. दिल्लीमध्ये देशातला हा पहिला प्रयोग करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच सरकारी कर्मचा-यांच्या निवृत्तीचं वय ५८ करण्याचा आमचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान कार्यालयापासून भ्रष्टाचारमुक्तीचं कामआपण हाती घेतलं असून ते हळूहळू तळागाळापर्यंत उतरवण्याचा आपला निर्धार असल्याचंही मोदी म्हणाले.
मोदींच्या भाषणातील आणखी काही मुद्दे:
– जो देशाचा मूड आहे तोच दिल्लीचा मूड आहे. देशभरात भाजपाला विजय मिळालाय, दिल्लीतही मिळणार.
– पंतप्रधान जनधन योजनेद्वारे आमच्या सरकारनं दाखवून दिलंय की हे सरकार गरीबांसाठीच काम करणार.
– भ्रष्टाचारानं देशाला बरबाद केलंय आणि मी भ्रष्टाचार संपवणार.
– २०२२ पर्यंत दिल्ली झोपडपट्टीमुक्त करणार. प्रत्येकाल पक्कं घर मिळणार.
– खोटानाटा प्रचार करण्याची दिल्लीत मोठी फॅक्टरी आहे, अशा प्रचाराला बळी पडू नका.
– दिल्लीत संपूर्ण बहुमत असलेलं सरकार निवडा. दिल्लीचं एक वर्ष फुकट घेलंय, आणखी काळ वाया घालवू नका.
– मोदी कधीही पाठित खंजीर खुपसणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका.
– विकास केवळ घोषणांनी होत नाही तर त्यासाठी परीश्रम लागतात आणि असे परीश्रम फक्त भाजपा घेऊ शकते.
– १५ ऑगस्ट पासून आजपर्यंत ११ कोटी गरीबांनी जनधन योजनेत खाती उघडली, त्यापैकी तब्बल १९ लाख खाती एकट्या दिल्लीतली आहेत.
– जनधन योजनेत गरीबांनी ८,५०० कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत.