शेकाप उमेदवाराला मतदान न केल्याने रोहा-डोंगरी गावातील २२ कुटुंबे वाळीत!

0
8

अलिबाग – रायगड जिल्ह्यात सामाजिक बहिष्काराची नवनवीन प्रकरणे उजेडात येत असून, जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापच्या उमेदवाराला मतदान न केल्यामुळे रोहा तालुक्यातील डोंगरी गावातील आठ कुटुंबांना गावकीने वाळीत टाकल्याचे प्रकरण पुढे आले आहे.
मात्र या वाळीत कुटुंबांतील तरुणांनी शेकाप पुढा-याच्या तालावर नाचणा-या गावकीच्या पंचांच्या हुकूमशाहीविरोधात आता आवाज उठवला आहे. पंच व गावातील शेकापचा पुढारी गणेश कृष्णा मढवी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
शेकापचे नेते गणेश कृष्णा मढवी जिल्हा परिषद निवडणुकीला उभे होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र डोंगरी ग्रामस्थांनी आपल्याला मतदान न केल्याने आपला पराभव झाला, असे मढवी यांचे म्हणणे आहे. त्यातून त्यांनी गावातील सर्व लोकांना वावे-पोटगे येथे जाऊन कालकाई देवीच्या डोक्यावर हात ठेवून, ‘मी गणेश मढवी यांना मतदान केले नाही तर माझे वाटोळे होऊ दे’ अशी शपथ घेण्यास सांगितले.
अशी शपथ घेण्यास नामदेव माया मढवी, काशीनाथ पांडुरंग शिंदे, स्वप्नील उत्तम शिंदे, किशोर महादेव भोनंगे, मोतिराम पांडुरंग शिंदे, यशवंत देवजी भगत, संतोष नामदेव झावरे व रमेश महादेव भोनंगे यांनी नकार दिला. त्यामुळे या आठ जणांच्या कुटंबीयांना गावकीने वाळीत टाकले आहे.
त्यापूर्वी गणपत चंद्रकांत मढवी, सतेज हरिश्चंद्र शिंदे व केशव माया मढवी यांचे हनुमान पालखी कार्यक्रमात गणेश मढवी यांचा नातेवाईक राजेंद्र पांडुरंग शिंदे यांच्याशी भांडण झाल्याने या तीन जणांच्या कुटुंबांना गावकीने वाळीत टाकले आहे.
वाळीत टाकलेल्या व्यक्तीशी संबंध ठेवल्याने यशवंत पांडुरंग झावरे, गावातील खारभूमीच्या कामांची माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकारात अर्ज केल्यामुळे सीताराम लखमा शिंदे, त्यांचे भाऊ अनिल लखमा िशदे व कृष्णा लखमा िशदे यांना वाळीत टाकण्यात आले आहे. यशवंत देवजी भगत या वाळीत असलेल्या आपल्या पुतण्याशी संबंध ठेवल्यामुळे निराधार असलेले वयोवृद्ध मुकुंद भगत यांना वाळीत टाकण्यात आले आहे.
वाळीत टाकण्यात आलेल्या मुकुंद भगत यांच्याकडे राहण्यास गेल्यामुळे त्यांचे जावई सत्यवान दत्तात्रेय माढवी यांनाही वाळीत टाकण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीस जाण्यास मनाई करण्यात आली. त्यांना मुंडनदेखील करू दिले नाही. गावकीचे पंच एवढय़ावरच थांबलेले नाहीत, त्यांनी सत्यवान मढवी यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.
विशेष म्हणजे पोलीस दलात असलेला सत्यवान मढवी यांचा भाऊ गावकीसोबत आहे. आपल्या गर्भवती पत्नीला रक्त आणण्यासाठी वाळीत असलेला मित्र सतेज शिंदे याची मदत घेतली म्हणून मनोज सीताराम भोनंगे यालाही वाळीत टाकण्यात आले आहे. वाळीत असलेल्यांकडे कुलदैवतेचे दर्शन घ्यायला गेल्यामुळे गजानन तुकाराम मढवी यांना, वाळीत असलेल्या काकांकडे गेल्यामुळे सुरेंद्र भगत यांना वाळीत टाकण्यात आले. गजानन मढवी यांच्याशी संबंध ठेवल्यामुळे वाळीत असलेल्या सासऱ्यांशी संबंध ठेवले म्हणून यशवंत भगत यांना वाळीत टाकण्यात आले आहे. वाळीत असलेल्या आपल्या मुलाकडे गेल्यामुळे चंद्रकांत मढवी यांनाही गावाबाहेर करण्यात आले आहे.
डोंगरी गावात अशी २२ कुटंबे बहिष्कृत जीवन जगत आहेत. या कुटुंबांतील तरुणांनी आता गावकीच्या जुलुमाविरोधात आवाज उठवला आहे. या सर्व प्रकरणात म्होरक्या असलेला गावातील शेकापचा पुढारी गणेश कृष्णा मढवी व इतर २७ जणांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.