मालवण : पूर्वांचलमधील आठ राज्यांमध्ये अद्यापही रेल्वे पोहोचलेली नाही. चीनच्या सीमेलगत असलेल्या या भागात रेल्वेचे जाळे वाढविण्यासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी केली. मार्च-एप्रिलमध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत सीमेलगतच्या राज्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
सत्कारप्रसंगी ते म्हणाले, देशाचा विकासदर वाढण्यामध्ये कनेक्टीव्हिटी महत्त्वाची आहे. रेल्वेमुळे देशाचे अर्थकारण बदलू शकते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास आहे. त्यामुळे पूर्वांचलांमधील राज्यात रेल्वेचे जाळे विणण्यासाठी केंद्राने २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे.
रेल्वे, विमानसेवेने सागरी किनारे जोडणार
देशाला ७ हजार ८०० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यांना रेल्वे व विमानसेवेने जोडण्याची योजना आहे. यातून आपली सध्या असलेली २ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था पुढील १० वर्षांत १० ते १५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा सुरेश प्रभूंनी व्यक्त केली.