गोंदिया, दि.११ : जीवन हे मुल्यवान आहे. सुरक्षित जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे काळजीपूर्वक पालन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज (ता.११) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथे परिवहन विभाग आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्तवतीने ११ ते २५ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फुलचूरच्या सरपंच लक्ष्मीबाई निर्विकार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, प्रभारी जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, नेत्रतज्ञ डॉ. जी.एल.दूधे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, अपघात टाळण्यासाठी सर्वानी सतर्क असणे महत्वाचे आहे. देशात वाहनांची घनता जास्त असून अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. वाहतूकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताला निश्चितच आळा बसेल असेही ते म्हणाले.
अपघात टाळण्यासाठी जनजागृती करणे महत्वाचे असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले अपघातामध्ये युवावर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडतो. अपघात प्रवणस्थळी धोक्याची सूचना तसेच स्पीडब्रेकर लावल्यास अपघाताला निश्चितच आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जीवन हे मुल्यवान असून प्रत्येकाने नियमाप्रमाणे वागल्यास अपघाताची संख्या कमी होईल. समाजाला जागृत करण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून युवावर्ग, स्वयंसेवी संस्था, पोलीस , परिवहन विभाग यांनी चांगल्या पध्दतीने करावे. असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना सरपंच निर्विकार म्हणाल्या अल्पवयातील बालकांना त्यांच्या पाल्यांनी वाहन चालविण्यास प्रतिबंध घालावा. प्रत्येकाने वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे. मुले ही प्रत्येक पालकाची संपत्ती असल्यामुळे मुलांच्या हाती वाहन देवू नये.
प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना आमदार संजय पुराम म्हणाले, विद्यार्थी जीवनापासूनच रस्ता सुरक्षेकडे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने बघावे. आयुष्य हे सुंदर आहे. त्यामुळे अपघात होणारच नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. मोबाईलच्या विश्वात आजची युवा पिढी हरविली आहे. वाहन चालवितांना सुध्दा मोबाईलचा वापर युवा वर्ग करतांना दिसतो. अपघात टाळण्यासाठी वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करु नये. लायसन असेल तरच वाहन चालवावे. अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रभारी जिल्हाधिकारी सोरमारे म्हणाले, दरवर्षी अपघात टाळण्यासाठी जनजागृतीच्या दृष्टीने रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात येते. अपघात केव्हा होईल हे सांगता येत नाही. मात्र अपघात टाळण्यासाठी वाहन चालकाने सतर्क असणे आवश्यक आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक मीणा म्हणाले, वाहतूक नियम हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवना महत्वपूर्ण आहे. या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत वाहतूक नियमांची माहिती पोहोचविण्यास मदत होईल. अपघातात मृत्यू पडणाऱ्यामध्ये युवावर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश असून युवकांनीच आता नियमांचे पालन करुन सुरक्षित जीवन जगण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा.
नगराध्यक्ष जायसवाल म्हणाले, वाहतूक नियमांची माहिती अभियानाच्या माध्यमातून देण्यात येत असल्यामुळे प्रत्येकाने संकल्प करावा की वर्षभर आपण अपघातमुक्त वाहन चालवू. नियमांचे पालन केल्यास अपघातमुक्त जीवन जगणे प्रत्येकाला शक्य होईल.
कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू म्हणाले, जिल्हयात आठ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. प्रत्येकाने अपघाताला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतल्यास अपघात होणार नाही आणि मृत्यूमुखीही कोणी पडणार नाही. जिल्हयातील रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत असल्याचे सांगून अपघातप्रवणस्थळी योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियनानिमित्त काढलेल्या माहिती पुस्तिका व पत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी एन.आर.निमजे यांनी केले. सुत्रसंचालन अपुर्व अग्रवाल यांनी केले. आभार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री धुमाळ यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थीनी यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोटार वाहन निरीक्ष विशाल भोवते, गजेंद्र सोनवणे, सहायक मोटार वाहन निरीक्षक संजय आडे, श्री देवधर, श्री पवार व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले