नवी दिल्ली – घरून आईचा आशीर्वाद घेऊन रोड शो द्वारे ते उमेदवारी दाखल करण्यास निघालेल्या अरविंद केजरीवाल यांनी अर्ज दाखन न करताच घरी परतावे लागले आहे. गर्दीमुळे केजरीवाल यांना अर्ज भरता आला नाही. त्यामुळे त्यांना तसेच घरी परतावे लागले आहे. त्यामुळे आता ते उद्या अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान त्यापूर्वी केजरीवाल यांनी काढलेल्या रोड शोमध्ये आपच्या अनेक प्रमुख नेत्यांचा सहभाग होता, मात्र कुमार विश्वास यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या. पण आमचे सुखी कुटुंब आहे त्यामुळे नको ते प्रश्न उपस्थित करू नका असे केजरीवाल यांनी पत्रकारांना सांगितले.
आम्ही सगळे नेते 24 तास सोबत राहत नाही. तसे म्हटले तर तुम्ही उद्या म्हणाल तुमची बायको आली नाही. अशा प्रकारे केजरीवाल यांनी सर्वकाही आलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपवर हल्ला करताना हा पक्ष म्हणजे खोटे बोलण्याची मशीन आहे असे म्हटले आहे. निवडणुकीत जनता आपला पूर्ण बहुमत देईल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
आईचा आशीर्वाद घेतला
केजरीवाल यांनी सकाळी आईचा आशीर्वाद घेऊन कामाची सुरुवात केली. त्यानंतर वाल्मिकी मंदिरात गेले. या मंदिरात एकेकाळी महात्मा गांधी वेळ घालवायचे. नरेंद्र मोदींनीही गेल्या वर्षी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात येथे केली होती.
केजरीवाल यांनी सोमवाली रात्री ट्वीटद्वारे नागरिकांना एका दिवसाची सुटी घेऊन रोड शोमध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती. दिल्लीत 49 दिवसांनंतर सत्तेतून पायउतार होण्याचा निर्णय चुकला होता, असे केजरीवाल यांनी अनेकदा मान्य केले आहे. त्यांचा हा निर्णय चूक होता हेही त्यांनी अनेकदा मान्य केले आहे. तसेच आणखी एक संधी देण्याची विनंती त्यांनी जनतेला केली आहे.
किरण बेदींना खुल्या चर्चेचे आव्हान
भाजपने किरण बेदींनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार घोषित केले आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे केजरीवाल यांनीही त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याच ओघात त्यांनी मंगळवारी किरण बेदी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. तसेच ट्वीटरवर किरण बेदींनी आपल्याला अनब्लॉक करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. बेदींनीही आव्हान मान्य असून आपण दिल्ली विधानसभेत चर्चा करण्यास तयार अशल्याचे सांगितले. तर काँग्रेसच्या अजय माकन यांनीही आपण चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.