शिक्षणापासून दीड कोटी विद्यार्थी वंचित

0
9

संयुक्त राष्ट्रसंघ : भारताने मुलांना शाळेपर्यंत नेण्यात बरीच प्रगती साधली असून मध्येच शाळा सोडून जाण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. २००० ते २०१२ या कालावधीत शाळा सोडण्याचे प्रमाण १.६० कोटींनी कमी झाले. तथापि, अजूनही प्राथमिक शिक्षणापासून १.४० कोटी मुले वंचित आहेत, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटले आहे.

दक्षिण आशियात विद्यार्थ्यांनी मध्येच शाळा सोडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे; पण २००० ते २०१२ या काळात हे प्रमाण कमी झाले आहे, असे युनेस्को आणि युनिसेफच्या संयुक्त अहवालात म्हटले आहे. ‘फिक्सिंग द ब्रोकन प्रॉमिस ऑफ एज्युकेशन फॉर ऑल’ असे या अहवालाचे नाव आहे. दक्षिण आशियातील अनेक लहान देशांमध्येही विद्याथ्र्यांनी शाळा सोडण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. एकट्या भारतात हे प्रमाण १.६० कोटीने कमी झाले आहे. २००० ते २०१२ या काळात एकून ४२ देशांनी शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. यात अल्जेरिया, बुरुंडी, कम्बोडिया, घाना, भारत, इराण, मोरोक्को, मोझाम्बिक, नेपाळ, रवांडा, व्हिएतनाम, येमेन आणि झाम्बियाचा प्रामुख्याने समावेश आहे. तथापि, अनेक देशांमध्ये सरकारी पातळीवर चांगले प्रयत्न करण्यात येऊनही जगभरात ८ टक्के मुले आणि १० टक्के मुली अजूनही प्राथमिक शिक्षणापासून वंचित असल्याचे या अहवालात नमूद आहे. २०११ मध्ये भारतात १.४० कोटी मुले-मुली प्राथमिक शिक्षण घेऊ शकले नाही. इंडोनेशिया, बांगला देश, नायजेरिया, पाकिस्तान आणि सुदान या देशांमध्येही हे प्रमाण जास्त आहे, असे अहवालात म्हटले आहे.