अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे दिल्लीत आंदोलन

0
6

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला १७ महिने उलटूनही त्याचा छडा लागलेला नाही. सीबीआयकडूनही तपासामध्ये काहीच प्रगती नसल्यामुळे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गा-हाणे मांडण्यात येणार असल्याचे हमीद दाभोलकर यांनी सांगितले़ तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे.

ओंकारेश्वर मंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर राज्य व केंद्र शासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ अंनिसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी हमीद दाभोलकर, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, शहराध्यक्ष माधव गांधी, कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी, नंदिनी जाधव, दिपक गिरमे उपस्थित होते.हमीद दाभोलकर म्हणाले, दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे जनप्रबोधनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. दाभोळकराचे मारेकरी जोपर्यंत सापडणार नाहीत तोपर्यंत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हच राहणार आहे, असा आरोप दाभोळकर यांनी केला आहे. कायदा व सुव्यवस्था साभाळणा-या यंत्रणेपुढे या मारेक-यांनी आव्हान उभे केले आहे.पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्ली जात असलेल्या अंनिसच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: यावे अथवा आपला प्रतिनिधी पाठवावा. सीबीआयने दाभोलकरांच्या खुनाचा तपास गतिमान करावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगावे, असे आवाहन हमीद दाभोलकर यांनी केले.