श्रीनगर, दि. २० – जम्मू काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर तिघा दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी हल्ला केला असून या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी शहीद झाला आहे. सध्या सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.
कथुआ जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर शुक्रवारी सकाळी तिघा सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. याशिवाय तसेच सीआरपीएफचे सात, पोलिस दलातील दोन जवान व एक नागरिकही या हल्ल्यात जखमी झाल्याचे समजते. सध्या सुरक्षा दलांनी या परिसराला गराडा घातला असून दहशतवाद्यांसोबत चकमकही सुरु आहे. केंद्रीय गृहखात्याने या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक व मुख्य सचिवांशी चर्चा करुन परिस्थितीची माहिती घेतली आहे. दहशतवादी रात्री सीमा रेषा ओलांडून भारतात आले व त्यांनी हा हल्ला घडवला असावा असा आरोप जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला.