रेणुका चौधरींवर लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – लाच घेतल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणुका चौधरी यांच्यावर तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी यांनी विधानसभेचे तिकीट देण्यासाठी १ कोटी १० लाख रुपये घेतले, अशी तक्रार येथील स्थानिक दलित नेत्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दाखल केली. तसेच याबद्दल जाब विचारला असता, रेणुका चौधरी यांनी या दलित नेत्याच्या पत्नीला जातीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चौधरी यांच्यावर अँट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बी. कलावती यांच्या तक्रारीच्या आधारावर हैदराबाद उच्च न्यायालयाने चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आपले पती रामजी यांच्याकडून कोट्यवधी रुपयाची लाच घेतल्याची तक्रार कलावती यांनी केली होती. वारा विधानसभा मतदारसंघात रामजी यांना तिकीट हवे होते. रामजी यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान मी कधीही त्या महिलेला भेटलेले नाही, तसेच माझ्यावरील आरोप निराधार असून राजकीय हेतून प्रेरित आहेत, राजकारणात असे आरोप होत असतात. अशी प्रतिक्रिया रेणुका चौधरी यांनी दिली आहे.