26.9 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home राष्ट्रीय देश आदर्श घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरू

आदर्श घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरू

0
24

मुंबई(वृत्तसंस्था)दि.28: भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या तीन पक्षांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करत भाजपाला जोरदार दणका दिला. मात्र आता केंद्र सरकारनं राज्यात स्थापन होणाऱ्या सरकारला पहिला धक्का दिला आहे. अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) आदर्श सोसायटी घोटाळ्याची चौकशी पुन्हा एकदा सुरू केली आहे.

आदर्श प्रकरणात नाव आल्यानं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेले होते. आता अशोक चव्हाण महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याची दाट शक्यता असताना ईडीनं आदर्श प्रकरणाची फाईल उघडली आहे.कुलाबा येथील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं मिळून महाविकास आघाडीचे सरकार आता सत्तेत येणार आहे. अशातच पुन्हा एकदा ही चौकशी सुरू झाल्यास त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही सोसायटी कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बांधली जात असताना तेथील ४० फ्लॅट सर्वसामान्य नागरिकांना देण्यासही महसूलमंत्री असताना त्यांनी परवानगी दिली, असा आरोप सीबीआयच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाणांविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी सीबीआयला परवानगी नाकारली होती. राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देता येत नसल्याने चव्हाण यांचे नाव या प्रकरणातून वगळण्याची विनंती सीबीआयने केली होती. मात्र, त्याविषयीचा सीबीआयचा अर्ज आधी सीबीआय न्यायालयाने आणि नंतर उच्च न्यायालयानेही फेटाळला होता.