३० खासदारांना हॉटेल अशोक सोडावे लागणार

0
5

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत हॉटेल अशोकमध्ये थांबलेल्या ३० खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपतेवेळी हॉटेल सोडावे लागणार आहे. दरम्यान हॉटेल सोडल्यानंतर या खासदारांच्या मुक्कामासाठी लोकसभा हाऊसिंग कमेटी पर्यायी व्यवस्था करत आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी दिली.

नायडू यांनी सांगितले की, लोकसभेच्या खासदारांना ८ मे पर्यंत तर राज्यसभा खासदारांना १३ मे पर्यंत अशोक हॉटेल सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासदारांच्या हॉटेलातील मुक्कामावर मीडियातून जोरदार टीका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही बाब गांभीर्याने घेतली. त्यांनी स्पष्टपणे बजावले की, जर खासदारांना हॉटेलमध्ये राहायचे असेल तर त्याचे बिलदेखील त्यांनाच चुकवावे लागेल.
अशोक हॉटेलमध्ये सप्टेंबर २०१४ पर्यंत एका खोलीचे भाडे ७, ००० रुपये होते. आता ते वाढून ९,००० रुपये झाले आहे. गेल्यावर्षी निवडणुकीनंतर प्रथमच लोकसभेत दाखल झालेल्या ३१५ खासदारांना आयटीडीसीने अशोक हॉटेलमध्ये थांबवले होते. तेव्हापासून सुमारे ३० खासदार तेथेच मुक्काम ठोकून आहेत. यावर माध्यामांनी लक्ष वेधले होते.