30.6 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home राष्ट्रीय देश माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले पवारांचे कौतुक

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले पवारांचे कौतुक

0
34

नागपूर,दि.19(विशेष प्रतिनिधी) : ‘शरद पवार अामचे खूप जुने सहकारी आहेत. प्रशासनावर पकड असलेले पवार हे केवळ राजकारणी नव्हे, तर मुत्सद्दी नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला नुकतेच नवे वळण देण्याचा प्रयत्न करुन त्यांनी देशाचे लक्ष वेधून घेतले’, असे गौरवोद्‌गार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बुधवारी काढले. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासोबत राजकीय जीवनात केलेल्या कार्याचा पटही उलगडला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्रातर्फे बुधवारी नागपुरात प्रतिभाताईंचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, कृपाल तुमाने, आमदार विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना पाटील म्हणाल्या, ‘लेकीचा गौरव ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे बाळासाहेब ठाकरेंनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मला पाठिंबा देऊन दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनाही तेच बाळकडू मिळाले अाहे.अ ाज व्यग्रतेतून वेळ काढून त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. बाळासाहेबांनंतर उद्धव यांनी शिवसेना सांभाळलीच नाही, तर काळानुरूप बदल करत यश मिळवल्याचे त्या म्हणाल्या.

बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ यांच्यासोबत केलेल्या कामाच्या स्मृतींनाही पाटील यांनी उजाळा दिला. १९६२ मध्ये पहिल्यांदा आमदार ते २०१२ मध्ये राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाले. ५० वर्षांच्या राजकीय जीवनात अनेकांचे प्रेम, मार्गदर्शन मिळाले. विरोधी पक्षनेता असताना शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर खूप शाब्दिक हल्ले करत होते, परंतु संबंधात कधीही कटुता आली नसल्याचे त्या म्हणाल्या. राज्यसभेचे सभागृह चालवण्याची, तर लोकसभेत असताना वाजपेयी यांच्या नेतृत्वात सार्क परिषदेत जाण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अनिल देशमुख यांनी, तर सूत्रसंचालन मधुकर भावे यांनी केले.

प्रतिभाताई विराेधी पक्षनेत्या म्हणून अाक्रमक : पवार

अापण मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेत्या म्हणून प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या स्वभावाविरुद्ध जाऊन आक्रमकतेने टीका केली. मुख्यमंत्र्यांची त्या कोंडी करत होत्या, परंतु नंतर आम्ही एकत्रितपणे कामे केली, असे नमूद करत शरद पवार यांनी राजकारणातील मैत्रीचे अनेक किस्से सांगितले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान बाळासाहेब ठाकरेंकडे पाठिंब्यासाठी अाम्ही गेलो असता त्यांनी ‘महाराष्ट्राच्या कन्येला पाठिंबा देणारच’, अशी ठाम भूमिका घेतली. आज त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून सत्काराला उपस्थित आहेत, हा चांगला योग आहे, असेही पवार म्हणाले.

blank