24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home राष्ट्रीय देश IFSC सेंटर मुंबईतच ठेवा, अन्यथा देशाचे आर्थिक नुकसान होईल;खा. शरद पवार

IFSC सेंटर मुंबईतच ठेवा, अन्यथा देशाचे आर्थिक नुकसान होईल;खा. शरद पवार

0
126

मुंबई,दि.03(वृत्तसंस्था)ः मुंबईतील आयएफएससी हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विरोध केला आहे. राजकारण बाजूला ठेवून  गुजरातमध्ये IFSC स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि गुणवत्तेच्या आधारावर मुंबईतच हे प्राधिकरण स्थानांतरित करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.  आयएफएससी सेंटर मुंबईलाच ठेवा. हे सेंटर गुजरातला हलविल्यास देशाचे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईची पतही घसरेल, असा इशारा यावेळी शरद पवार यांनी दिला.

IFSC प्राधिकरण ही देशातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधील सर्व वित्तीय सेवांचे नियमन करण्यासाठी युनिफाइड एजन्सी आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक भांडवल यादृष्टीनेही IFSC ला स्थानांतरित करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आणि स्थान आहे असेही शरद पवार म्हणाले. गुजरात येथे IFSC प्राधिकरण नेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर शनिवारी (२ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.

शरद पवारांनी तासाभरात १२ ट्विट्स करून याबद्दलची आकडेवारी दिली आहे. सरकारी सिक्युरिटीजच्या माध्यमातून २६ केंद्राला २६ लाख कोटी रुपये मिळतात. यातील ५ लाख ९५ हजार कोटी रुपये महाराष्ट्रातून मिळतात. तर गुजरातचा वाटा १ लाख ४० हजार कोटी रुपये (५.४%) इतका आहे. महाराष्टातून केंद्राला इतका निधी जात असताना आयएफएससी गुजरातला हलवण्याचा निर्णय अतिशय वाईट आणि चुकीचा असल्याचे पवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.महाराष्ट्रातून आर्थिक संस्था आणि उद्योग गुजरातला नेण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे गरज नसताना राजकीय गोंधळ निर्माण होईल. मुंबईचे आर्थिक महत्त्व कमी करण्याच्या या निर्णयांमुळे देशाचे आर्थिक नुकसान होईल, असं पवारांनी ट्विटमध्ये नमूद करत काही आकडेवारीदेखील दिली आहे.