नवी दिल्ली, २7 जून -नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आगामी १५ जुलैपर्यंत आंतररराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. देशासह जगातही कोरोनाबाधितांचा रोज नवा आकडा समोर येत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय १२ ऑगस्टपर्यंत रेल्वेप्रवासही करता येणार नाही, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू केला. साधारणत: अडीच महिन्यांच्या काळानंतर २५ मे रोजी काही अटींसह देशांतर्गत ठराविक मार्गांवरच विमान वाहतूक सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही सुरू होण्याची अपेक्षा असतानाच कोरोनाचे संकट दिवसांगणिक गडद होत असल्याने १५ जुलैपर्यंत विमान वाहतूक सुरळीत होणार नाही. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानुसार, पुढील काळात ठराविक मार्गावरीलच आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली जाईल. तसेच, त्या-त्या वेळच्या गरजेनुसार निर्णय घेतला जाईल.याशिवाय रेल्वे मंत्रालयानेही लॉकडाऊन वाढवला असून, १२ ऑगस्ट २०२० पर्यंत रेल्वेप्रवास करता येणार नाही. पॅसेंजर, मेल, एक्स्प्रेस, उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास तीन महिन्यांपासून रेल्वेची प्रवासी सामान्य सेवा बंद आहे. रेल्वे विभागाने १४ एप्रिल रोजी आणि त्याआधी करण्यात आलेल्या सर्व नियमित वेळापत्रकानुसार धावणाèया गाड्यांचे बुकिंग रद्द केले आहे. त्याची पूर्ण रक्कम प्रवाशांना देण्यात येणार आहे. एका माहितीनुसार, सामान्य प्रवाशी रेल्वे सुरू होण्यासाठी अजून बराच कालावधी लागू शकतो.





