विदर्भ हे मुख्यमंत्र्यांचे कुटुंब नाही का?-खा.मेंढे

0
545
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भंडारा=जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वी महापूर येऊन गेला. होत्याचे नव्हते झाले. शेतकरी झालेल्या नुकसानीने गर्भगळीत झाला. त्यावेळी मुख्यमंत्री सोडा शासनातील एक दोन अपवाद वगळता कोणालाही धीर देण्यासाठी यावे वाटले नाही. मात्र, आज पश्‍चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या परिस्थितीनंतर सर्वजण तिकडे धावू लागले आहेत. मुख्यमंत्री गेल्या सात महिन्यांपासून खर्‍या अर्थाने ‘माझे घर माझी जबाबदारी’ या भूमिकेत राहिले आहेत. परंतु पश्‍चिम महाराष्ट्रात पाहणी करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेत त्यांनी एकाच राज्यातील दोन वेगवेगळ्या प्रदेशांना सापत्न वागणूक देत असल्याचे त्यांनी दाखवून दिले असल्याचा आरोप भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी केला आहे.
मागील सहा महिन्यांपासून फक्त स्वत:च्या घरात बसून असलेल्या मुख्यमंत्र्यांना आता मात्र पश्‍चिम महाराष्ट्रातील पूर्ण पीडितांच्या दु:खाची जाणीव झालेली दिसते. पवार कुटुंबातील सदस्य पाहणी करून आल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करणार असे जाहीर केले आहे. पूर पिडीतांच्या बाबतीत हेच सौजन्य पूर्व विदर्भाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी दाखविणे अपेक्षित होते. परंतु ते त्यांनी केले नाही. कोरोना, पुर आला तरी फक्त घरात बसलेले मुख्यमंत्री फक्त पश्‍चिम महाराष्ट्रातील बधितांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी घराबाहेर पडत असतील तर ही त्यांची कृती भेदभावपूर्ण आणि पूर्व विदर्भातील बांधवांवर अन्याय करणारी आहे. आजपयर्ंत केवळ माझे घर माझी जबाबदारी या उपक्रमाप्रमाणे वावरणार्‍या मुख्यमंत्र्यांना अचानक घराबाहेर पडण्याचे सौजन्य कसे आले हाही चिंतनाचा विषय असून मुख्यमंत्री केवळ काही भागाचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत याची जाणीव त्यांनी ठेवावी, असा सल्लाही खासदार सुनील मेंढे यांनी दिला.
मुख्यमंत्री घरात बसले असताना भाजप नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना आणि पूर संकटात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येकची विचारपूस केली याची जाणीवही खासदार मेंढे यांनी करून दिली आहे.