भंडारा :– कामगार विरोधी लेबर कोड, शेतकरीविरोधी कृषी कायदे, शिक्षण विरोधी नवीन शैक्षणिक धोरण -2020, सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण, महागाई ,बेरोजगारी इत्यादी मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध आयटक सह देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी केलेल्या देशव्यापी संपाच्या आवाहनाच्या अनुषंगाने भंडारा जिल्हा आयटक व भाकप च्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर ला 12 वाजता भंडारा कलेक्टर कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
सदर आंदोलनाचा निर्णय दि. 19 नोव्हेंबरला राणा भवन भंडारा येथे संपन्न झालेल्या आयटक व भाकप च्या जिल्हा कौन्सिलच्या सभेत घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड माधवराव बांते होते. तर भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड शिवकुमार गणवीर व राज्य कार्यकारणी सदस्य कॉम्रेड हौसलाल रहांगडाले व अंगणवाडी युनियन चे राज्य कार्याध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाने यांनी मार्गदर्शन केले. आयटक व भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगर सेवक कॉम्रेड हिवराज उके यांनी प्रास्ताविक करून मागील सभेच्या आढावा व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली.
किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड सदानंद इलमे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व कॉम्रेड सविता लुटे यांनी कामगारांच्या प्रश्नावर मनोगत व्यक्त केले.सभेत वरील देशव्यापी आंदोलनाच्या निर्णया सोबतच विधान परिषद निवडणूक, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक, सभासद नोंदणी,6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिन ते 26 डिसेंबर भाकपच्या स्थापनादिना निमित्त जनसमस्यांवर जनजागरण व जनआंदोलन करणे इत्यादी विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
संचालन तालुका सचिव काॅम्रेड गजानन पाचे यांनी केले . समारोपीय भाषणात कॉम्रेड माधवराव बांते यांनी दि. 26 नोव्हेंबरच्या धरणे आंदोलनात कामगार किसान व विविध संघटनेच्या सभासदांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे निवेदन व आवाहन केले.
आयटक व भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी आभार व्यक्त करून धरणे आंदोलनात सहभागी होताना कोरोना पासून संरक्षणासाठी लाॅकडाउनच्या नियमांचे पालन करावे. सर्वांनी मास्क घालून यावे व शारीरिक अंतर ठेवावे असे आवाहन केले.याप्रसंगी कॉम्रेड वामनराव चांदेवार कॉम्रेड माणिकराव कुकडकर ,ग्यानिराम नेवारे ,दिलीप क्षिरसागर ,गौतम भोयर,गणेश चिचामे,महादेव आंबाघरे, दिलीप उंदीरवाडे,राजू बडोले, गौतमी मंडपे ,महानंदा नकाते, वंदना पेशने, मीनाक्षी बांबोडे ,पुरुषोत्तम बावणे ,देवांगणा सयाम ,मिताराम उके इत्यादींची उपस्थिती होती. अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कॉम्रेड हिवराज उके यांनी दिली.