रब्बी हंगामातील मका खरेदी केंद्र सुरु करा-अविनाश पाल

0
12

सावली- शासकीय गोदामातील रब्बी हंगाम २०२०-२०२१ मधील भरडधान्य (मका) खरेदीसाठी संबंधिताना आदेश देण्यात यावे, अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष, तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर अविनाश पाल यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनातून केली आहे.
तालुक्यात शाश्वत सिंचन सुविधा नाही. त्यामुळे येथील शेतकरी नदी, नाले, विहीर, बोअर यांच्या माध्यमातून सिंचन करून उत्पादन घेतात. सावली तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी असलेल्या गावातील शेतकरी मका पिकाचे प्रामुख्याने उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात मका खरेदीसाठी मोठे व्यापारी नाहीत. सध्या कोविड पार्श्वभूमीवर लहान व्यापारी शेतकऱ्याचा मका घेण्यास असमर्थ आहेत. शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२०-२०२१ मधील भरडधान्य शेतमालाची खरेदी विक्री केली जाते. परंतु, अद्याप शासकीय गोदामामध्ये मका खरेदी केंद्र सुरु झालेली नाही. तसेच, खरीप हंगामातील धानाची गोदामात साठवणूक करण्यात आली असून हे धान शासनाने अद्याप उचल केलेली नसल्याने मका खरेदीसाठी गोदाम उपलब्ध नाही. परिणामी, रब्बी हंगामातील धान व मका विक्रीसाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगाम २०२०-२०२१ मधील भरडधान्य (मका) शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासकीय गोदामामध्ये खरेदी करायचे असल्याने संबंधित तहसिलदाराना मका शेतमाल खरेदीचे आदेश देण्यात यावे. तसेच या योजनेंतर्गत खरीप हंगामात गोदामातील धान त्वरित उचलून गोदाम उपलब्ध करून द्यावे व रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना आदेश द्यावे. असी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष, तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर अविनाश पाल यांनी पालकमंत्री, सुधीरभाऊ मुंगनटीवार तसेच जिल्हाधिकारयाकडे केली आहे.