मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली

0
31

मुंबई, दि. 16 :- राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.राजीव सातव यांनी आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले होते. संसदीय प्रणालीवर दृढ विश्वास असणारे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबावर, पक्षावर मोठा आघात आहे, तो सहन करण्याची शक्ती सातव कुटुंबियांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खासदार राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रतिभाशाली उमदे नेतृत्व हरपले!

मुंबई, दि. 16 : आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.खा.सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा.सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. पुढील काळात देश व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित केले जात होते.खा.राजीव सातव यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी मोठी हानी आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातील त्यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सातव कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

खासदार राजीव सातव यांच्या निधनाने युवा नेतृत्वास देश मुकला – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई. दि. १६ : आपल्या कार्याने युवकांसाठी आदर्श ठरलेल्या खासदार राजीव सातव यांचा निधनाने युवा नेतृत्वास देश मुकला आहे, अशा शब्दात शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोक संदेशात प्रा.गायकवाड म्हणतात, खासदार राजीव सातव यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात मराठवाडा येथून केली. हिंगोली मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समिती सदस्य, जिल्हापरिषद सदस्य, म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००९ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. सन २०१४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत ते लोकसभेवर निवडून गेले होते.  सन २००८-२०१० या कालावधीत महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. त्यांना पक्षाने युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून २०१० ते २०१४ या कालावधीत काम करण्याची संधी दिली. गुजरात निवडणुकीतही भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने त्यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती.

खासदार राजीव सातव यांचे सर्व पक्षातील लोकांशी मित्रत्वाचे संबंध होते. दूरदृष्टी असलेले एक अजातशत्रू , सात्विक , सोज्वळ  व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. एका कर्तृत्ववान युवा नेत्याच्या अकाली निधनाने भारतीय राजकारणाची व सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, असेही प्रा. वर्षा गायकवाड यांनी आपल्या शोकसंदेशात  म्हटले आहे.