मोदी पुराणांवर विज्ञान लादत आहेत – गोगई

0
8

गुवाहटी (पीटीआय) – एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुराणांवर विज्ञान लादत आहेत तर दुसरीकडे शास्त्रज्ञांचे कौतुकही करुन दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांनी केला आहे.

मोदी यांनी अलिकडेच पुराणांचा संदर्भ देत हत्तीचे तोंड असलेल्या गणपतीवर प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून हत्तीचे तोंड लावण्यात आल्याचे विधान केले होते. त्यांच्या या वक्‍त्यावर गोगई यांनी ट्‌विटरद्वारे हल्ला करत मोदी हे पुराणांवर विज्ञान लादत आहेत. पण सोबतच मंगळमोहिमेबद्दल शास्त्रज्ञांचे कौतुकही करत आहेत. भारतीय जनता पक्ष एका बाजूला धर्मनिरपेक्षपणा, ऐक्‍य आणि सलोख्याच्या गोष्टी करत असतानाच भाजपचे काही नेते हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

केंद्रीय विद्यालयात जर्मनवर बंदी आणण्याचा निर्णयही मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आणल्याचाही उल्लेख गोगई यांनी केला आहे. तसेच ही भाजपची दोन चेहरे असून अशा भिन्न विचारांमुळे आपण एकविसाव्या शतकात नेतृत्त्व करू शकतो का? असा सवालही गोगई यांनी उपस्थित केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाच्या मुद्यावर हल्ला करत आसामच्या मुख्यमंत्री कार्यालयानेही पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी भारतीय जनता पक्षाचे दोन चेहरे जगासमोर दिसत असून जनतेची फसवणूक केली जात असल्याचे म्हटले आहे.