वाराणसी- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून तब्बल ३ लाख ७१ हजार ७८४ मतांनी विजयी झाले होते. याच विधानसभा क्षेत्रात ३ लाख ११ हजार ५७ बोगस मतदार आढळले आहेत. बोगस मतदारांची तपासणी अद्याप सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार जिल्हा प्रशासनाने मतदार यादीचे पुन्हा परीक्षण केले. जिल्हयातील सर्व बूथ अधिका-यांनी घरोघरी जाऊन या गोष्टीची पाहणी केली असता वास्तव समोर आले. ही घटना समोर आल्यावर आम आदमी पक्षाने मोदी व भाजपावर टिकेची झोड उठवली आहे. आम आदमी पक्षाच्या फेसबुक पेजवर या घटनेबद्दल आप ने तिव्र शब्दात समाचार घेतला आहे.
तसेच, निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी असे दिलेल्या माहितीनुसार ६लाख ४७ हजार ८५ बोगस मतदार असण्याची शक्यता आहे. सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी दया शंकर उपाध्याय यांनी दिलेल्या माहिती नुसार कैंट या विधानसभाक्षेत्रातून ८१ हजार ६९७ बोगस मतदार सापडले आहेत, तर, पिंडारा विधानसभा क्षेत्रात ३५ हजार ९८२, अजगरा विधानसभाक्षेत्रामध्ये १५ हजार २८५ शिवपुर मध्ये १० हजार ९८१ रोहनिया मध्ये १९ हजार ६५९ सेवापुरी मध्ये ७ हजार ३७२ शहरातल्या उत्तर आणि दक्षिण विभागात अनुक्रमे ७० हजार ६८४ व ६९ हजार ३९७ बोगस मतदार सापडले आहेत. बोगस मतदारांचे नाव मतदार यादीतून काढण्यात येत आहे.
वाराणसी मधून निवडणुक लढवणा-या उमेदवारांनी मोदींवर मतदारांना उपहार वाटल्याचा आरोप केला होता, त्याचप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी मोदींनी आपल्या पत्नीची माहिती निवडणुक आयोगाला दिली नसल्याने इलाहबाद उच्च न्यायालयात मोदींविरुद्ध तक्रार केली होती.