मागण्यांसाठी घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे-जयदीप कवाडे

0
20

-शरद पवारांच्या घरावरील एसटी आंदोलकांच्या हल्ल्याचा पीरिपाचा तिव्र निषेध

-एस. टी. कामगारांना भडकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा-जयदीप कवाडे

मुंबई दि. 8 एप्रिल 2022 देशाचे जेष्ठ नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटीच्या मागण्यासांठी संप पुकारलेल्या काही आंदोलकांनी आज चपला फेकून पवार साहेंबावर अर्वाच्य भाषेत घोषणा देत भ्याड हल्ला केला. एसटी सपंकऱ्यांनी केलेल्या या कृत्याचे जितके निषेध करावे तितके कमीच आहे. मागण्यांसाठी जेष्ठ नेत्याच्या घरावर असे घृणास्पद कृत्य करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, अशी प्रतिक्रीया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. आज मुंबईतील या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून आंदोलकांना चिथवाणी देणारे कोण आहेत? त्याचा पोलिसांनी शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे करण्यात येत असल्याचेही जयदीप कवाडे यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळून त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे ही नेहमीच पीपल्स रिपब्लिकन पक्षाची भूमिका राहिली आहे. सरकारनेही त्यांच्या काही मागण्यांवर सकारात्मक पाऊल उचलले. परंतु, काही मागण्यांसाठी कामगार अजुनही संपांवर आहेत. विशेष म्हणजे, कालच न्यायालयानेही एसटी संपावर निर्णय दिला तो निर्णयही सर्वांना मान्य आहे. परंतु, आज अचानक काही एसटी संपकरांचा एक मोठा घोळका शरद पवारांच्या घरावर भ्याडरित्या चालून गेला. नियोजनबद्धतीने केलेला हा हल्ला दिसत आहे. या आंदोलकांना कोणीतरी शिकवून पाठवलेले असावे. या आंदोलकांना कुणी तरी उकसवून पाठविले असावे. या प्रकारामागे जो कोणी असेल त्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जयदीप कवाडे यांनी केली.

वातावरण बिघडवण्याचा प्रकार

आजही आम्ही सर्वजण एसटी कामगारांच्या पाठीमागे आहोत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे पण अशा प्रकारे एखाद्या जेष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. काही मतभेद असतील, त्यांच्या काही मागण्या असतील तर चर्चेतून मार्ग निघू शकतो. अशा पद्धतीने महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांना कायद्याच्या चैकटीत जर बसेल अशी कठोर कारवाई करावी असेही जयदीप कवाडे म्हणाले.