शेतक-यांचे ठिय्या आंदोलन

0
13

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या परिसरात ठिय्या आंदोलन करत शेतक-यांच्या सरकारविरोधातील घोषणांनी उपराजधानी दणाणली.
नागपूर- कर्जबाजारीपणा, नापिकी, दुष्काळ अशा असंख्य समस्यांनी हैराण झालेल्या शेतक-यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या परिसरात ठिय्या आंदोलन करत, सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रचंड मोठ्या संख्येने शेतक-यांनी हजेरी लावली. सरकारविरोधातील घोषणांनी उपराजधानी दणाणली.
शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोशी व अन्य नेत्यांशी गुरुवारी चर्चा केली. त्यातून काहीच पदरात न पडल्याने संघटना आपल्या आंदोलनावर ठाम होती. दुपारी १२ वाजताच्या सुमारास गिरीपेठेत जमल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघाले. मात्र, सर्वांना लगेच अडवण्यात आले. यावेळी बोलताना वक्त्यांनी भाजपाने केलेल्या घोषणांची आठवण करून दिली.
शेतमालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती व्हावी, वीज बिल माफी आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानापासून काही अंतरावर रविवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली गिरीपेठेतील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण केदार यांच्या कार्यालयाजवळून शेतक-यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे कूच केले. पण, सर्वाना अमरावती रोडवरील जी.एस. कॉलेजच्या प्रवेशद्वारजवळच अडवण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तेथेच ठिय्या देऊन, देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षात असताना त्यांनी केलेल्या मागण्या आणि दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली.
नेत्यांना गावबंदी करा
यापुढे आंदोलनाचा त्रास शेतक-यांना होता कामा नये म्हणून गावातच नेत्यांना गावबंदी करा, असे आवाहन शरद जोशी यांनी यावेळी बोलताना केले. गावात भाषणासाठी आलेल्या नेत्यांना बोलू देऊ नका. त्यांच्यासमोर प्रश्न मांडा, त्याची खरी उत्तरे मिळाल्यानंतरच भाषण होऊ द्या. अन्यथा येणा-या नेत्यांना हुसकावून लावा. गावोगावी हे आंदोलन उभारा, अशी सूचना त्यांनी केली.