भंडारा जिल्ह्यात पं. स. सभापती राकाँ चार, काँग्रेस दोन तर भाजपा एक

0
88

भंडारा:- जिल्ह्यातील सात पंचायंत समितीच्या सभापती व उपसभापती पदांसाठी निवडणुका घेण्यात आल्या असून निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाला संमिश्र यश आले. राष्ट्रवादीने सर्वाधिक चार पंचायंत समित्यावर सभापतीपद मिळवित सर्वांत मोठा पक्ष असल्याचे सिद्ध केले. तर काँग्रेसने दोन पंचायंत समित्यावर सत्ता काबीज करून आपले सभापती खुर्चीवर बसवले.मात्र भारतीय जनता पक्ष भंडारा जिल्ह्यात दुभंगली गेल्याने फक्त तुमसर पंचायत समितीवर सभापती निवडून आणता आले.तर मोहाडी पंचायंत समितीमध्ये आरक्षणामुळे राष्ट्रवादीला फायदा झाला. भाजपा बहुमतात असतांना सुद्धा अनुसूचित जातीचा उमेदवार नसल्याने उपसभापती पदावर समाधान मानावे लागले.

मोहाडी राष्ट्रवादीने वरठी येथील ऑटो चालक असलेल्या रितेश वासनिक या तरूणावर विश्वास दाखवित सभापतीपदी बसविले. तर उपसभापतीपदी भाजपाने कुशारी येथील बबलू मलेवार यास पसंती दर्शविली. रितेश वासनिक यांची अविरोध निवड झाली तर बबलू मलेवार ८ विरूद्ध ६ च्या फरकाने निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादीचे बाणा सव्वालाखे याचा पराभव केला.                          भंडारा पंचायंत समितीवर राष्ट्रवादीने सत्ता काबीज करीत सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रत्नमाला चेटूले विजयी ठरल्या. उपसभापतीपदी भाजपाचे प्रशांत खोब्रागडे विजयी झाले. पवनी पंचायंत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कर्झेकर सभापती पदी विराजमान झाल्या तर उपसभापतीपदी शिवसेनेचे विनोद बागडे विजयी ठरले. तुमसर पंचायत समितीवर भाजपाने झेंडा फडविला. भाजपाचे नंदू राहांगडाले सभापती तर उपसभापतीपदी काँग्रेसचे हिरालाल नागपूर हे विजयी झाले.साकोली येथे काँग्रेसचे गणेश ओले यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या सविता करंजेकर विजयी झाल्या. लाखनी पंचायंत समितीवर सुद्धा काँग्रेसने विजय मिळवित सभापतीपदी प्रणाली सार्वे यांची ईश्वरचिठ्ठीने निवड झाली. तर उपसभापतीपदी भाजपाचे गिरीश बावणकुळे सुद्धा ईश्वरचिठ्ठीने भाग्यवान ठरले. लाखांदूर पंचायंत समिती सभापती व उपसभापतीपदी राष्ट्रवादीने झेंडा फडविला. सभापतीपदी संजय वरखडे तर उपसभापतीपदी निमबाई ठाकरे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते सुनिल फुंडे,माजी खासदार मधुकर कुकडे,नाना पंचबुध्दे,धनजंय दलाल यांनी व्युवरचना आखत सर्वाधिक जागा मिळविल्या असून जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरण आपल्या हाती असल्याचे राष्ट्रवादीने दाखविले आहे.