8 पैकी 5 पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व,काँग्रेस 1 व चाबी संघटना 1,वंचित 1

0
109

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडी चमत्कार दाखवणार

गोंदिया ,दि.07- गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज 6 मे रोजी झालेल्या निवडणुकीत 5 पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाने झेंडा फडकवला.तर सालेकसा पंचायत समितीवर काँग्रेसने सत्ता काबीज केली.जिल्ह्याचे लक्ष असलेल्या गोंदिया पंचायत समितीमध्ये मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस व जनता की पार्टी(चाबी सघंटना)ला यश मिळाले.पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूकीचे समीकरण स्पष्ट झाले असून चाबी संघटना ही महाविकास आघाडीसोबत जाणार हे निश्चित झाले आहे.भारतीय जनता पक्षाला आत्ता दोन अपक्ष जिल्हा परिषद सदस्यांना सोबत घेतल्याशिवाय सत्ता स्थापनेचा पर्याय उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यातच अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने वंचित व अपक्षाना सभापती व उपसभापती पद देत जिल्हा परिषदेत अपक्षांना संधी असल्याचे संकेत दिले आहेत.असे असले तरी महाविकास आघाडीही जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपली व्युवरचना तयार करीत असल्याने भाजपला सत्तेत बसण्यासाठी अपक्षांची मनधरणी चांगलीच करावी लागणार आहे.

गोंदिया पंचायत समितीच्या सभापती चाबी संघटनेचे मुनेश रहागंडाले व उपसभापतीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निरज उपवंशी निवडून आले.चाबी संघटनेचे मुनेश रहागंडाले यांनी भाजपचे योगराज उपराडे यांचा 8 मतांनी पराभव केला.तर उपसभापती पदाच्या निवडणुकीत निरज उपवंशी यांनी भाजपचे विनोद बिसेन यांचा 8 मतांनी पराभव केला.गोंदिया पंचायत समितीमध्ये 28 सदस्य असून भाजपकडे 10 तर चाबी संघटना 10,राकाँ 5,अपक्ष 3 असी सदस्य संख्या आहे.

तिरोडा,गोरेगाव,आमगाव,सडक अर्जुनी,देवरी पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व
तिरोडा पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपच्या सौ.कुंता रामप्रकाश पटले तर उपसभापती पदावर पत्रकार हुपराज जमईवार बिनविरोध निवडून आले.आमदार विजय रहागंडाले यांना आपल्या विजयाचे श्रेय दिले आहे.

गोरेगाव पंचायत समिती सभापतीकरीता झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे इंजि.मनोज शामलाल बोपचे तर उपसभापतीपदाकरीता राजकुमार रामविलास यादव यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

आमगाव पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र रेखलाल गौतम हे सभापती तर मनोहरलाल फुलीचंद चौधरी हे उपसभापती पदावर निर्विरोध निवडून आले आहेत.

सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या सौ संगिताताई तेजराम खोब्रागडे व उपसभापतीपदी शालींदर कापगते यांची निर्विरोड निवड झाली आहे.

देवरी पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या सौ. अंबिका बंजार तर उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे अनिलकुमार बिसेन निर्विरोध निवडून आले.

अर्जुनी मोर पंचायत समिती सभापती पदावर वंचित व अपक्षाचा ताबा

अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी वंचित आघाडीच्या सौ.सविता कोडापे तर उपसभापती पदावर अपक्ष होमराज पुस्तोडे विजयी झाले.या दोन्ही पदाच्या उमेदवारांना भारतीय जनता पक्षाने समर्थन देत.काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले.याठिकाणी भाजपचे 6,काँग्रेस 4,राकाँ 2,वंचित 1 व अपक्ष 1 सदस्य निवडून आले होते.

सालेकसा पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा

सालेकसा पंचायत समितीच्या सभापतीपदावर काँग्रेसच्या प्रमिला गणवीर तर उपसभापती संतोष बोहरे निर्विरोध निवडून आले आहेत.येथील सभापतीपद हे अनुसूचित जाती महिलाकरीता राखीव होते.