भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांचे उमेदवारी अर्ज दाखल

0
14

मुंबई,दि.30ः राज्यसभेसाठी भाजपने आज आपल्या 3 उमेदवारांचे अर्ज दाखल केले. विधान भवनातील निवडणूक कार्यालयात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि राज्याचे माजी कृषिमंत्री व विदर्भातील नेते डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी अर्ज भरले. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रमुख भाजप नेते उपस्थित होते.

घोडेबाजाराचा प्रश्नच नाही

उमेदवारी दाखल केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आमच्या तिन्ही जागा निवडून येतील. घोडेबाजार करण्याचा प्रश्नच नाही. कसे निवडून येतील, ही रणनीती माध्यमांसमोर बोलायची नसते. भाजपने कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांना राज्यसभेचे तिसरे तिकीट देऊन संभाजीराजे छत्रपती यांना फसवण्याचा प्रयत्न केला. यामाध्यमातून राज्यसभेसाठी घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न स्पष्ट दिसून येते, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेला धडा शिकवू

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, अशा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांच्या जोरावर आपले आमदार निवडून आणले. मात्र, नंतर आमचा विश्वासघात केला. त्यामुळे या निवडणुकीतून शिवसेनेला धडा शिकवणार असल्याचे गोयल म्हणाले.

चुरस वाढली

विधानसभेत भाजपचे 106, शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेसचे 44 या संख्याबळानुसार भाजप 2, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष व छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने शिवसेनेचे 2 सदस्य निवडून येऊ शकतात. मात्र, भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उभा केल्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यामुळे आघाडी आणि भाजप हे आपल्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव कशी करतात याबद्दल उत्सुकता आहे.