UPSC परीक्षेचा निकाल जाहीर:श्रुती शर्मा देशातून पहिली, टॉप 10 मध्ये 4 मुलींनी मारली बाजी

0
69

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा-2021 चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मा ही देशातून पहिली आली आहे. अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या तिन्ही जागांवर मुलींनी मारलेली बाजी यंदाच्या निकालाचे खास वैशिष्ट्य आहे. टॉप 10 मध्ये 4 मुलींचा समावेश आहे. परीक्षार्थींना आपला निकाल upsc.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

अव्वल स्थान पटकावलेली श्रुती शर्मा सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे. जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादमीमध्ये तिने युपीएससी परीक्षेची तयारी केली. युपीएससीची प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती. परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारीदरम्यान घेण्यात आली आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी लागला. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत ही शेवटची फेरी 26 मेपर्यंत चालली. त्यानंतर आज निकाल जाहीर करण्यात आले.

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि केंद्रीय सेवा गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मध्ये सेवेची संधी मिळणार आहे.

टॉप 10 परीक्षार्थी
1. श्रुती शर्मा
2. अंकिता अग्रवाल
3. गामिनी सिंगला
4. ऐश्वर्य वर्मा
5. उत्कर्ष द्विवेदी
6. यक्ष चौधरी
7. सम्यक एस जैन
8. इशिता राठी
9. प्रीतम कुमार
10. हरकीरत सिंग रंधावा