राज्यसभेसाठी पाचव्यांदा प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रवादीतर्फे अर्ज सादर

0
42

गोंदिया/मुंबई,दि.30 : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रफुल पटेल यांनी आज विधान भवन, मुंबई येथे आपला अर्ज सादर केला. अर्ज सादर करताना प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित होते. प्रफुल पटेल यांनी राज्यसभेसाठी पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.पटेलांनी उमेदवारी अर्ज सादर केला,त्यावेळी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे सर्वच नेत्यांनी मुंबईत हजेरी लावली होती.

गेली ३२ वर्षे महाराष्ट्रातील जनतेच्या आणि पक्षातील नेत्यांच्या आशीर्वादानेच मी राजकारणात सतत कार्यरत आहे. यातून देशाच्या आणि राज्याच्या हिताची कामे करण्याची संधी मला मिळाली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस  प्रफुल पटेल यांनी केले.महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची मते आणि महाविकास आघाडी सरकारला मानणाऱ्या इतर अपक्ष सदस्यांची मते यांचा हिशोब केला तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही, असे प्रफुल पटेल म्हणाले. महाविकास आघाडीतील आमदारांना आपले मत देताना ते मत आपल्या पक्ष प्रतोदांना दाखवून करावे लागेल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे चारही उमेदवार निवडून येतील, याची खात्री असल्याचे प्रफुल पटेल म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मित्र पक्षांचे आमदार व अपक्ष आमदारांशी चर्चा केल्यानंतरच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार दिलेला आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भातील आपले मत माध्यमांसमोर मांडले.जयंत पाटील म्हणाले कि, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये चढाओढ सुरु आहे. महाविकास आघाडी सरकार आणि भाजपलाही काही मतं कमी पडत आहेत. ज्या अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे त्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो, त्यामुळे आम्ही सहावा उमेदवार उभा केला आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

प्रफुल पटेल हे पाचव्यांदा राज्यसभेवर जाणार आहेत.2000-06,2006-09,2014-16,2016-22 असे सलग चारवेळा राज्यसभेचे खासदारपद त्यांनी भुषवले आहे.पहिली लोकसभा निवडणुक वयाच्या 33 व्या वर्षात 1991 ला लढवली आणि त्यात ते बहुमताने विजयी झाले.त्यानंतर 1996 च्या लोकसभा निवडणुकीतही विजयी झाले.1998 मध्ये तिसर्यांदा लोकसभेत ते निवडुन गेले.त्यानंतर 2009 मध्ये लोकसभेत निवडून गेले.2004 व 2014 मध्ये त्यांना भाजपकडून पराभव स्विकारावा लागला होता.