तिरोड्याच्या महिला नागरी सहकारी पतसंस्थेत कोट्यवधीचा आर्थिक घोळ;पत्रकार परिषदेत गुंतवणूकदार व खातेदारांचा आरोप

0
39

तिरोडा, दि.30 : तिरोडा येथील महिला नागरी सहकारी पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रूपयांचा आर्थिक घोळ  झाला असून लोकांची रक्कम मुदत संपल्यावरही परत केली जात नाही. असा आरोप रविवार, 29 एप्रिल रोजी शहीद मिश्रा विद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गुंतवणूकदार व खातेदारांनी केला आहे. संबंधित विभागाने या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषी अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा व ठेवीदार आणि खातेदारांना न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार व खातेदार श्रीराम सोमा धुर्वे, आर.पी. नागपूरे, ए.जी. नागपूरे, बाबुराव डोंबळे, शोभेलाल लिल्हारे, टी.एम. मडावी, भावना हुमणे, मंजु वैद्य आदि खातेदार, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सविस्तर असे की, अनेक गुंतवणूकदार व खातेदारांनी महिला नागरी पतसंस्था तिरोडा येथे दैनिक ठेव, आवर्त ठेव व मुदत ठेव इत्यादि खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा केली. मुदत संपल्यानंतर ते पैशाची मागणी करण्याकरिता संस्थेत गेले. मात्र अध्यक्ष छाया दिलीप मडावी, व्यवस्थापक व संचालक मंडळ हे त्यांना अनेक कारणे सांगून पैसे देण्यास नकार देत आहेत. संस्थेत कर्जाची वसूली झाली नाही, सध्या आमच्याकडे पैसे नाहीत, अशी अनेक करणे सांगून टाळाटाळ केली जात आहे. या संदर्भात उपनिबंधक गोंदिया यांच्याकडे तक्रार करण्यात आली. मात्र आतापर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे पत्र परिषदेत सांगण्यात आले.

तक्रारकर्ते सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी संस्थेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाला वारंवार पैशाची मागणी केली. मात्र त्यांचे पैसे परत मिळाले नाही. तेव्हा आता आपले जीवन कसे जगावे, असा बिकट आर्थिक प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. या प्रकारामुळे दिवसेंदिवस त्यांची मानसिक व शारीरिक स्थिती खालावत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

पोलीस ठाण्याकडून ‘नो रिस्पॉन्स’; संस्थेच्या अध्यक्षांची ठेवीदारांना धमकी

सदर प्रकरणाची ठेवीदार व खातेदारांनी अनेकदा तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र जोपर्यंत आपण पतसंस्थेचे ऑडिट रिपोर्ट आमच्याकडे सादर करीत नाही, तोपर्यंत आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही. अशी तांत्रिक अडचण ठाणेदार सांगतात. तसेच कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

तसेच महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष हे पैशाची मागणी करण्याकरिता गेलेल्या ठेवीदारांना, ठाणेदारांना फोन लावून ठेवीदारांना धमकावतात. सहकारी संस्था गोंदियाचे उपनिबंधक यांच्याकडे अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आले. मात्र त्यांनी अजूनपर्यंत एकही पत्राचे उत्तर दिले नाही. तसेच कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मागील 8 महिन्यापासून पतसंथेचे ऑडिट सुद्धा झालेले नाही.

विभागीय सहनिबंधकांच्या पत्राला केराची टोपली

सर्व ठेवीदारांनी 6 डिसेंबर 2021 रोजी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नागपूर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर विचार करून त्यांनी जिल्हा उपनिबंधक गोंदिया यांना 17 जानेवारी 2022 रोजी पत्र क्रमांक 157/2022 प्रमाणे संस्थेची चौकशी करून अर्जदारांना कळविण्याचे म्हटले आहे. परंतु अजूनपर्यंत त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

संस्थेत 1.20 कोटींचा गैरव्यवहार

सन 2020-21 च्या अंकेशन अहवालानुसार, सदर संस्थेत 1.20 कोटींचा गैरव्यवहार झालेला आहे. त्यामुळे सदर संस्थेला लेखा परीक्षण वर्ग ‘ड’ देण्यात आला आहे.

सर्व गुंतवणूकदार व खातेदार यांना अजूनपर्यंत ठेवीची रक्कम व योग्य न्याय न मिळाल्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती खालावत आहे. त्यांचे जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. संचालक मंडळ व अध्यक्षाने केलेल्या फसवणुकीवर लक्ष केन्द्रित करून संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालक मंडळ यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच ठेवीदार व खातेदार यांची जमा रक्कम व्याजासह मिळवून देण्यात यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केली आहे.