शेकडो शेतकर्‍यांचा खासदार कार्यालयावर हल्लाबोल

0
49

भंडारा- जिल्ह्यात मोठया प्रमाणात शेतकर्‍यांनी रब्बी धानपिकांचे उत्पादन घेतले असतांना केंद्र सरकारने आखुन दिलेल्या धान खरेदीच्या अल्प र्मयादेमुळे शेतकरी संकटात सापडल्याने केंद्र सरकारने धान खरेदीची र्मयादा वाढवून जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे संपूर्ण धान खरेदी करण्याचे आदेश द्यावे या मागणीकरीता विकास फाऊंडेशन तर्फे आज ४ जून रोजी खासदार सुनील मेंढे यांच्या कार्यालयावर माजी आमदार तथा विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकर्‍यांनी हल्लाबोल करीत खासदारांन निवेदन दिले.
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २0 ते २२ लाख क्विंटल रब्बी धानपिकांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षीसुध्दा जिल्ह्यात जवळपास २२ ते २५ लाख क्विंटल रब्बी धानपिकांचे उत्पादन झाले. असतांना केंद्र सरकारने आधारभुत धान खरेदीच्या माध्यमातुन फक्त ४ लाख ९१ हजार क्विंटल धान खरेदीचे लक्ष निर्धारित केल्याने उर्वरित शेतकर्‍यांनी आपला धान कुठे विकायचा? असा प्रश्न उभा ठाकला होता. धान खरेदीची र्मयादा कमी असल्यामुळे अवघ्या एक दोन दिवसातच धान खरेदी केंद्रावर धान खरेदी बंद पडली. त्यामुळे शेतकर्‍यांना आपले धान खुल्या बाजारात विकण्याची पाळी आली होती. व्यापार्‍यांकडुन शेतकर्‍यांच्या धानाला फक्त ११00 ते १४00 रुपये प्रति क्विंटल एवढाच भाव दिल्या जात असल्याने शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होवून शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकर्‍यांवर ओढावलेल्या या संकटात विकास फाऊंडेशनच्या माध्यमातुन शेकडो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत खासदार यांच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत त्यांना शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार सुनील मेंढे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करीत शेतकर्‍यांवर ओढावलेले संकट दूर करण्याकरीता केंद्र सरकारने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे संपूर्ण धान खरेदी करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे, खा.सुनील मेंढे, जिल्हा मार्केटींग अधिकारी पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले, जिल्हा परिषद सदस्य बंडु बनकर, जि.प.सभापती राजेश सेलोकर, तुमसर पंचायत समिती सभापती नंदु रहांगडाले, मोहाडी पंचायत समिती उपसभापती बबलु मलेवार यांच्यासह विकास फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते.