मुंबई-आमच्या (मविआ) आमदारांना फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू आहे, असा आरोप शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरुपयोग सुरू आहे. आमदारांना धमकावल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. ज्या प्रकारे ते फोनवर आमच्या आमदारांना बोलतात, त्यांची भाषा ऐकूण विरोधकांना केंद्राच्या सत्तेची गर्मी आली आहे. आमच्याकडे या साऱ्या प्रकाराची रेकॉर्डिंग असून, वेळ आल्यावर सर्व पुरावे समोर आणू, असा इशाराही त्यांनी दिला.
देश कुठे चाललाय?
पटोले म्हणाले की, या पद्धतीची लोकशाही असू शकत नाही. मतदानाच्या अधिकारापासून वंचित करण्याचे काम ज्या पद्धतीने सुरू आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीन न्याय मिळवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन संरक्षण देण्याची मागणी करतात, याचा अर्थ आपला देश कुठल्या दिशेने चालला आहे, याचा अंदाज सगळ्यांना यायला पाहिजे.
योग्य वेळी भूमिका मांडू
पटोले म्हणाले की, योग्य वेळी आम्ही जनतेसमोर ही भूमिका मांडणार आहोत. आमच्याकडे त्यांची रेकॉर्डिंगही आहे. ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग सुरू आहे. ते आम्हाला या निवडणुकीच्या तोंडावर लक्षात आले आहे. आम्हाला मतदान करा, नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, अशा धमक्या आमच्या आमदारांना आलेल्या आहेत. ही परिस्थिती लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. भाजपने किती त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचे सर्व सहा उमेदवार विधान परिषदेवर निवडून येतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
‘मविआ’ने केले स्टिंग
पटोले म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत आणि आता विधान परिषद निवडणुकीत देखील भाजप तपास यंत्रणाचा वापर करत आहे. विधान परिषद निवडणुकीत आम्ही नक्कीच जिंकू. त्यानंतर मात्र, जनतेसमोर या सर्व क्लिप आणू. महाविकास आघाडीने केंद्रीय तपास यंत्रणांचा आणि भाजपचे स्टिंग ऑपरेशन केल्याचेही त्यांनी सांगितले.
पटोलेंच्या आरोपांना भुजबळांचा दुजोरा:म्हणाले – भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न
विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदारांना धमकीचे फोन येत आहेत, असा गंभीर आरोप आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही दुजोरा दिला. भाजप फोडाफोडीचे प्रयत्न करणारच. विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील आमदारांवर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे, असा आरोप भुजबळ यांनी केला.
तपास यंत्रणांचा गैरवापर
नाना पटोलेंच्या आरोपांवर छगन भुजबळ म्हणाले, पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. त्यामुळे आमदारांना धमकावले जात असेल, तर त्यांच्यापर्यंत या बाबी नक्कीच गेल्या असतील. तसेही केंद्रीय पथके आता मविआ आमदारांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करत आहेत. त्यामुळे राज्यात अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याच काम सुरू आहे. राजस्थानमधील निवडणुकीतही भाजपने असेच राजकारण केले, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.
अपक्षांचे मतदान महत्त्वाचे
भुजबळ म्हणाले, कोणत्याही निवडणुकीत छोट्या पक्षांचे तसेच अपक्ष आमदारांचे मतदान महत्त्वाचे ठरते. त्यासाठी त्यांना आपल्याकडे खेचण्याचा सर्वच पक्ष प्रयत्न करतात. त्यात तसे काही वाईट नाही. आमच्याकडूनही आमदारांना वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करणे चुकीचे आहे.