मुंबई | राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा विजय झाला. पण शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपने सातवा उमेदवार उभा केला होता. त्यामुळे ही निवडणूक जास्त चुरशीची ठरली.येत्या विधान परिषद निवडणुकीत आपले दोन्ही उमेदवार जिंकून यावे यासाठी शिवसेनेकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सर्व आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
अनेक नकारात्मक राजकीय घडामोडी घडू शकतात. त्यामुळे आमदारांनी गाफील राहू नये. हॉटेलमध्ये नातेवाईक आणि मित्रांपासून दूर राहा. आपल्याला विधान परिषद निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे, अशा सूचना शिवसेना आमदारांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काँगेस नेत्यांची बैठक झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी गुप्त बैठक पार पडली. यासाठी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यानंतर दोघंही एकाच गाडीत बाहेर पडले. मात्र, आता या सर्वादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं समोर आलं आहे.