राज्यातही कॉंग्रेस विरोधी पक्षनेतेपदाला मुकणार?

0
17
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई-विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या आठ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होते आहे. येत्या शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यामध्ये शिवसेनेचे नेतेही मंत्रिपदाची शपथ घेतील. सत्तेत सहभागी झाल्यामुळे सध्या शिवसेनेकडे असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त होईल. या स्थितीत हिवाळी अधिवेशनात नव्याने विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल. कॉंग्रेसने यापूर्वीच विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. कॉंग्रेसचे विधानसभेत ४२ सदस्य आहेत. मात्र, गेल्या अधिवेशनावेळी विधानभवन परिसरात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून कॉंग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या स्थितीत हिवाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये कॉंग्रेसचे ३७ सदस्य असतील. त्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त सदस्य असणाऱया राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही यावेळी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाऊ शकतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेत ४१ सदस्य आहेत. सभागृहातील पक्षीय बलाबल लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्यांना विरोधी पक्षनेतेपद देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसे झाल्यास पाच आमदारांचे निलंबन मागे घेतले जात नाही, तोपर्यंत कॉंग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत.