राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी

0
12

मुंबई-गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या शुक्रवारी सकाळी होणार आहे. या विस्तारामध्ये शिवसेनाही भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असून, शिवसेनेचे १२ नेते मंत्रिपदाची शपथ घेतील, असे समजते. त्याचबरोबर भाजपचे १० नेते यावेळी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. येत्या ८ डिसेंबरपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, त्यापूर्वी मंत्रिमंडळचा विस्तार करण्यात येतो आहे. मुंबईतील विधान भवनाच्या प्रांगणात होणाऱया कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव मंत्र्यांना पद आणि गोपनयीतेची शपथ देतील.
शिवसेना सत्तेत सहभागी होणार का, या मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सन्मानजनक प्रस्ताव दिल्याशिवाय सत्तेत सहभागी होणार नाही, असा पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यानंतर भाजपकडून शिवसेनेला पाच कॅबिनेट आणि सात राज्यमंत्रीपदे देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. तो शिवसेनेने मान्य केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळेच शिवसेनेने सत्तेत सहभागी होण्याचे निश्चित केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपचे सरकार पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशनाला सामोरे जात आहे. केवळ दहा मंत्री घेऊन अधिवेशनाला सामोरे जाणे अवघड असल्याचे फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केले होते.