‘भाजपा मानसोपचार फंड’साठी वंचितचे भीक संकलन

0
13

अकोला-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे अकोल्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. वंचित बहुजन आघाडीने ‘भाजप मानसोपचार फंड’ संकलनासाठी शहरात विशेष मोहीम राबवली. या माध्यमातून जमा झालेली २८९ रुपयांची ‘भीक’ वंचितने मनोरुग्णालयाला ‘मनी आर्डर’ केली.राज्यपाल, भाजपचे मंत्री, नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांसंदर्भात वादग्रस्त वक्तवे करीत आहेत. त्याविरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाली. शहरातील फतेह चौक, खुले नाट्यगृह, गांधी चौक, ताजना पेठ, मोहम्मद अली मार्ग आदी ठिकाणी प्रत्येकी एक रुपया ‘भाजपा मानसोपचार फंड’ म्हणून संकलित केला. जमा झालेली २८९ रुपयांची भीक चंद्रकांत पाटील यांच्या उपचारासाठी ठाणे आणि नागपूर येथील मनोरुग्णालयासाठी ‘मनी ऑर्डर’ करण्यात आली.भाजपाच्या मनुस्मृतीवृत्तीला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करीत आंदोलनाचा समारोप करण्यात आला. युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, जय तायडे यांच्या नेतृत्वात भीक संकलन करण्यात आले. यावेळी अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संगीता अढाऊ, पूर्व महानगर अध्यक्ष शंकर इंगळे, सीमांत तायडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.