नवनिर्वाचित ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांचा सत्कार येत्या शनिवारी

0
15

 महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन

देवरी,ता.१९:  आमगावं/देवरी विधानसभा क्षेत्रातील सालेकसा, आमगांव व देवरी या तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा सत्कार सोहळा आणि मकरसंक्रांतीनिमित्त महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन कॉंग्रेस पक्षाच्या वतीने येत्या शनिवार, रविवार आणि सोमवारी तालुकास्थळी आयोजित करण्यात आला आहे.

 या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या पत्नी सिमाताई कोरोटे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सालेकसा तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार शनिवारी (दि.२१) स्व. भरतभाई बहेकार यांच्या कॅम्पस मध्ये करण्यात आला आहे. आमगाव तालुक्याताल पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात रविवारी (दि.२२) रोजी तर देवरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार देवरीच्या सीताराम मंगल कार्यालयात सोमवारी (दि.२३) रोजी करण्यात येणार आहे. या तिन्ही ठिकाणी महिलांच्या हळदीकुंकू या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिप सदस्य उषा शहारे या असतील. कार्यक्रमाचे उद्घाटन महिला सामाजिक कार्यकर्त्या सीमा कोरोटे यांचे हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिप सदस्य राधिका धरमगुळे,देवरीच्या माजी सभापती सुनंदा बहेकार, जिप सदस्य उषा मेढे, विमल कटरे, छबू उके,वंदना काळे, मीना लिल्हारे, छाया नागपुरे, सालेकसाचे सभापती प्रमिला गणवीर, माजी जिप सदस्य माधुरी कुंभरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला आमदार सहसराम कोरोटे हे देखील उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला तिन्ही तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.