विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महाविकासआघाडीने अखेर उमेदवार केले जाहीर

0
23

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी अखेर महाविकासआघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रीत बैठक घेत आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली. यामध्ये सत्यजित तांबेंना काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तसेच त्यांचं पक्षातून निलंबनही करण्यात आलं आहे. राज्यात मागच्या काही दिवसांपासून पदवीधर मतदार संघाच्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणुकीची बिगुल वाजल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलेच वातावरण तापलेले पाहायला मिळाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सत्यजित तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेस काही काळ बँकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता पक्षाने थेट तांबे यांच्यावर कारवाई करत त्यांचं निलंबन केलं आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या जागांसाठी महाविकासआघाडीने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये नाशिकमधून शुभांगी पाटील, नागपूर- सुधाकर आडबाले, कोकण- बाळाराम पाटील, औरंगाबाद- विक्रम काळे, अशी नावे घोषीत करण्यात आली आहेत. यावेळी काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.