बाळासाहेबांची जयंती,पक्षप्रमुखपदाचा शेवटचा दिवस;मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार?

0
15

मुंबई – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सायंकाळी संवाद साधणार आहेत.माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ आजच संपणार असल्याने उद्धव ठाकरे आज कोणते मुद्दे छेडतात, शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे आली आहेत. सत्तासंघर्षाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून शिवसेना पक्षाचं अस्तित्व निवडणूक आयोगाच्या दरबारी आहे. तर, नुकतंच पावसाळी अधिवेशनात शिंदे गटातील अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार महाविकास आघाडीने बाहेर काढले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागेललं आहे.

दरम्यान, आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावण्यात येणार आहे. विधिमंडळाकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातले सर्व महत्त्वाचे नेते हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर “राज्यातील २८८ आमदार, ७८ विधान परिषदेचे सदस्य यांच्यावतीने हा कार्यक्रम संपन्न होत असल्याने तो सर्वांगीण स्वरुपाचा आहे. त्यामुळे कुणीही कार्यक्रमाची उंची कमी होईल, असे विधान कुणीही करु नये”, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांनाही शासकीय आमंत्रण आले आहे. त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित असतील का याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. मात्र, त्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत.

वंचितसोबत आज आघाडीची घोषणा

दुपारी १ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी शिवसेना-वंचित युतीची घोषणा करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही पक्षात युतीसाठीची जोरदार तयारी सुरू होती. अनेक बैठका पार पडल्या. अखेर चर्चेअंती या दोन्ही पक्षांनी युती करण्याचे ठरवले आहे. त्याबाबत आज अधिकृत घोषणा होणार आहे.