जिल्हाधिकाऱ्यांचा साधेपणा;कर्मचाऱ्यांसोबतचा झिंगाट डान्स व्हायरल

0
46

वर्धा :-आयएएस-आयपीएस अधिकारी म्हटलं की कडक शिस्त अशी प्रतिमा आपल्या डोळयासमोर येते. पण अधिकारी देखील कधी कधी आनंदाचे क्षण शोधत असतात. वर्ध्यात महसूल विभागाचा दोन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात डीजेच्या तालावर महसूल विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठेका धरला. यात वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी विनायक महामुनी यांनीही सहभाग घेतला.जिल्हाधिकारी यांचा डान्स पाहूण उपस्थित सर्वांनीही त्यांना साथ दिली. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

झिंगाट, सामी, मुंगडा या गाण्यावर डान्स करताना जिल्हाधिकारी दिसले. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमानंतर महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या नृत्यात जिल्हाधिकारी यांनी सहभागी होत सर्वांची मने जिंकली.जिल्हाधिकाऱ्यांसोबत अप्पर जिल्हाधिकारी,निवासी उपजिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार यांनीही ठेका धरला होता.

या महोत्सवादरम्यान रस्सीखेच स्पर्धा सुद्धा घेण्यात आलीय. यात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी विनायक महामुनी यांच्या नेतृत्वात अधिकारी तर दुसरीकडे कर्मचारी होते. या स्पर्धेत कर्मचाऱ्यांनी बाजी मारलीय.कार्यक्रमाचे नियोजन हे निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे आणी अधीक्षक विजय लोखंडे यांनी केले होते.