शहरातील समस्यांना घेऊन शहर काँग्रेसचे पालिकेसमोर आंदोलन

0
22

गोंदिया, ता. १४ ः प्रशासकराज असलेल्या नगर परिषदेचे शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. जागोजागी रस्ते फुटले आहेत. केरकचऱ्याने नाल्या चोख झाल्या आहेत. डम्पींग यार्डचा प्रश्न अजूनही कायम आहे. अशा एक नव्हे, अनेक समस्या शहरात आ-वासून उभ्या आहेत. या समस्या घेऊन महिनाभरापूर्वी नगर परिषदेला घेराव घालण्यात आला होता. मात्र, अजूनही समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे शहर काॅग्रेस कमिटीने मंगळवारी (ता. १४) धरणे आंदोलन केले. याउपरही नगर परिषदेने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
शहरातील प्रभाग क्रमांक दोन येथे पथदिव्यांची समस्या आहे. पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. मुलांना खेळण्यासाठी ग्रीन जीम नाही. प्रभाग क्रमांक तीन येथे गोंदिया पब्लीक स्कूलच्या मागील बोरवेल तीन महिन्यांपासून बंद आहे. कित्येक नाल्या चोख आहेत. प्रभाग क्रमांक चारमधील विवेकानंद काॅलनीस्थित पाणीटाकीच्या बाजूला नगर परिषदेची तीन एकर जमीन आहे. या जमिनीत नाल्याचे पाणी जमा होत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पथदिव्यांची सोय नाही. नाल्यावरील लहान पूल जागोजागी फुटला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेचे प्रशासक करणकुमार चव्हाण यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. मात्र, कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या या कारभाराविरोधात शहर काॅंग्रेस कमिटीने धरणे आंदोलन केले.
आंदोलनात काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गुप्ता, पी. जी. कटरे, अमर वराडे, विनोद जैन,रमेश अंबुले, आलोक मोहंती, बाबा बागडे, हरीश तुळसकर, अमर राहुल, रूपाली उके, मनीष चव्हाण, मंथन नंदेश्वर, चित्रा लोखंडे, पंकज पिल्ले, अरुण गजभिये, जितेश राणे, सोलंकी, सचिन मेश्राम, निलीमा शहारे, विष्णू नागरिकर, नंदा खापर्डे, भारत खापर्डे, रोहीत बोरकर, अनिल गाैतम, सूर्यप्रकाश भगत यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.