प्रत्येक घरामधून मुलीचा सन्मान व्हावा

0
12

महाकवी डॉ. सुधाकर गायधनी : जकातदार विद्यालयात ग्रंथोत्सवाचे उद्‌घाटन

भंडारा दि. 14 : मुलामुलींमध्ये भेदभाव करणाऱ्या काही अनिष्ट प्रथा आजही समाजात आहेत. त्या मुलींच्या जन्मापासून तिला शिक्षण देताना आणि लग्न जुळवताना प्रकर्षाने दिसून येतात. त्याचा आपण सर्वांनी नेहमी निषेध केला पाहिजे. जिथे महिलांचा सन्मान होत नाही, तो देश कधीही महान होऊ शकत नाही. त्यामुळे मुलींचा व महिलांचा सन्मान दुखावल्या जाऊ नये, यासाठी सर्वांनी अनिष्ट प्रथा सोडून आपल्या घरापासून मुलीचा सन्मान सुरू करावा, असे मत आंतरराष्ट्रीय किर्तीचे महाकवी डॉ. सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले. येथील जकातदार विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

            या कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हा कोषागार अधिकारी श्री. बावीसकर यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती पद्‌मश्री पुरस्कार प्राप्त झाडीपट्टीचे रंगकर्मी परशुराम खुणे, प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. प्रा. मंजूषा सावरकर, ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, नायब तहसीलदार निंबार्ते, प्राचार्य कुर्झेकर उपस्थित होते.

            या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून ग्रंथप्रदर्शनीचे उद्‌घाटन करून करण्यात आली. या ठिकाणी दोन दिवस ग्रंथप्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पद्‌मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम खुणे यांचा शाल-श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. गायधनी यांनी पुढे बोलताना, शहरातील सर्व विद्यालयांमधील वर्ग नऊ व दहावीचे विद्यार्थी इथे येणे अपेक्षित होते. त्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी तसे पत्र सर्व शाळांना पाठवायला हवे होते, अशी खंत व्यक्त केली. तसेच पद्‌मश्री परशुराम खुणे यांचा संबंधित चार जिल्ह्यांनी झाडीतील रंगकर्मी भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करावा, अशी सूचना केली.

सत्काराला उत्तर देताना पद्‌मश्री खुणे यांनी सांगितले की, ग्रंथ मानसाला जगण्याचे तंत्र व मंत्र देतात.आपण चांगल्या भावनेतून व निष्ठेने कोणतेही कार्य केले तर, यश मिळते. आपला समाज हाच विखुरलेले विद्यापीठ आहे. त्यातून पाहिजे ते सर्व शिकता येते. मात्र, विद्यार्थ्यांनी पुढे कितीही मोठे झाले तरी, आपला स्वाभिमान जागृत ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

उद्‌घाटक श्री बावीसकर यांनी थोरांचा व पुस्तकांच्या सहवासातून जीवनाचा मार्ग सोपा होत जातो,अस सांगितले. डॉ. मंजूषा सावरकर यांनी वाचनाची सवय लावल्यास पुस्तकांमधून चांगले विचार आत्मसात करून आपला स्वत:चा विकास साधता येतो, असे सांगितले. यावेळी नायब तहसीलदार निंबार्ते, प्राचार्य कुर्झेकर यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकातून ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथोत्सव व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.  या कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर आणि रोशन उरकुडे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील वाचनालयाचे पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

तत्पूर्वी सकाळी विद्यालयात ग्रंथदिंडीचे पूजन करून शहरातील मुख्य रस्त्यावरून दिंडी नेण्यात आली. यातून ग्रंथोत्सव व ग्रंथप्रदर्शनीची माहिती व वाचनाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी व कर्मचारी तसेच जकातदार विद्यालयाचे शिक्षक-शिक्षिका व नागरिक उपस्थित होते.