कोकणात उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचं भगवं वादळ,तर उध्दव ठाकरेंच्या सभेला तुफान गर्दी

0
16

खेड:-:-शिवसेना पक्ष आणि धनुष बाणाचे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा कोकणातील खेड येथे रविवारी सायंकाळी पार पडली.या सभेला विशाल असं भगवं वादळ सभेच्या ठिकाणी घोंघावताना दिसलं. या जाहीर प्रचंड सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. या सभेला हिंदू स्थानिकांसहित सर्व धर्मियांनी आपुलकीने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

मोदींचं नाव वापरून महाराष्ट्रात मत मागून दाखवा

राज्यात गुलामगिरी सहन करणार नाही. तुम्ही फक्त मोदींचं नाव वापरून महाराष्ट्रात मत मागून दाखवा. बाळासाहेबांच्या नावाशिवाय मत मागून दाखवा. मोदींच्या नावाने मत मागून दाखवा. हिंमत असेल चोरलेलं धनुष्यबाण घेऊन तुम्ही मैदानात या, मी मशाल घेऊन मैदानात येतो. निवडणुकीला सामोरं जा,’ असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप तसंच एकनाथ शिंदेंना दिलं आहे.

निवडणूक आयोगावर टीकास्त्र

शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली, निवडणूक आयोगाच्या नाही. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही. निवडणूक येऊद्या त्यांना ठेचून टाकू. शिवसेना आमची आई आहे. ज्यांना मोठं केलं त्यांनी आपल्या आईवर वार केले. लाज वाटत नसेल तर तुमच्या आई-वडिलांचं नाव लावा आणि मैदानात या, असं चॅलेंजही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं.तसेच शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबद्दल निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये पहिल्यांदाच जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्याला निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही, असं ते उघडपणे म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवरही निशाणा साधला. “आज संजय कदम आणि त्यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत आणलेले आहेत. हो मी शिवसेनाच म्हणणार. कारण निवडणूक आयोगाचा फैसला मला मान्य नाही. अजिबात नाही. निवडणूक आयोग चिन्ह आणि नाव देऊ शकतं. पण पक्ष देऊ शकत नाही. आम्ही देणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी दंड थोपटले.

जे भुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार, तोतया आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही शिवसेना नाव चोरु शकाल असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही शिवेसना नाही चोरु शकत. धनुष्यबाण तुम्ही कदाचित चोरला असेल पण तो तुम्हाला पेलवेल असं अजिबात नाही. धनुष्यबाण घेऊन रावण उताणा पडला. मग मिंदे काय उभा राहणार?”, असा घणाघात त्यांनी केला.

शिंदे यांनाही दबाव तंत्रावरून झापलं

महाविकास आघाडीचं सरकार चांगलं चाललं होतं. मग बिघडलं कुठे? माशी शिंकली कुठे? माशी एकाच ठिकाणी शिंकली, आज जसं राजन साळवी, बाकीचे आपले आमदार आहेत, नितीन देशमुख यांनी तर भर सभेत सांगितलं की, कसा त्यांचा छळ केला. अनिल परब आहेत, एक तोतरा थर्माकॉलचा हातोडा घेऊन येतो. पण खरा हातोडा तुला पेलेल का? आता स्वत:च्या डोक्यावर पडायची वेळ आली. केवळ छळायचं. राजन साळवींच्या घरी धाड. घराचं मोजमाप घेतात. आता परत १३ की १५ तारखेला कुटुंबियांना बोलावलं आहे. राजन साळवी काय देशद्रोही आहेत का?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

रामदास कदम यांच्या कुटुंबात फूट?कदम यांच्या भावाकडून उद्धव ठाकरे यांचा सत्कार

रत्नागिरी ::-शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी रत्नागिरीतील खेड तालुक्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली. खेड तालुका हा शिवसेनेच्या रामदास कदम यांचा मतदारसंघ. त्यांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या खेड दौऱ्यादरम्यान रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतली असली तरी रामदास कदम यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ठाकरेंचा सत्कार केला. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

उद्धव ठाकरे यांचा सदानंद कदम यांच्या कुटुंबियांकडून सत्कार करण्यात आला. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे बंधू आहेत. रत्नागिरीत साई रिसॉर्टमध्ये ही भेट घेण्यात आली. त्यानंतर कदम कुटुंबियांकडून उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे कदम कुटुंबातच उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्यावरुन मतभेद असल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या सभेत शिवसेना नेत्यांनी रामदास कदम यांच्यावर प्रत्यक्ष टीका केली. पण स्वत: उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर प्रत्यक्ष टीका करणं टाळलं. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना रामदास कदम यांचं नावही घेतलं नाही.