अग्नीवीरमध्ये भरती होण्यासाठी 15 मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करा-  जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
50

प्रथम परीक्षा, नंतर शारीरिक चाचणी

जॉईन इंडियन आर्मी संकेतस्थळावर अर्ज करा

गोंदिया, दि. 6 : अग्नीवीर सैन्यदल भरतीसाठी पूर्वी शारीरिक चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जायची. मात्र, यंदाच्या भरती प्रक्रियेत आधी लेखी परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची 15मार्च ही तारीख असून गोंदिया जिल्ह्यातील तरूण तरुणींना सैन्यात भरती होण्याची ही सुवर्ण संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिली.

अग्नीवीर भरती संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोतमारे बोलत होते. यावेळी नागपूर येथील सैन्यदल भरती केंद्राचे कर्नल आर. जगथ नारायण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर उपस्थित होते.

अग्नीवीर भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नावनोंदणी 16 फेब्रुवारी ते 15 मार्च या दरम्यान अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. परीक्षा 17 एप्रिल ते 04  मे या कालावधीत होणार आहे. नागपूर व अमरावती येथे परीक्षा केंद्र असणार आहे. परीक्षेचा निकाल 20 मे  रोजी घोषीत होणार आहेत असे त्यांनी सांगितले.

विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला व यवतमाळ या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. या पदभरतीच्या माध्यमातून अग्निवीर (जनरल ड्युटी), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर (क्लर्क, स्टोअर किपर टेक्निकल), अग्निवीर ट्रेडसमन दहावी पास, अग्निवीर ट्रेडसमन आठवी पास ही पदे भरली जाणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील तरुणांना औरंगाबाद येथील भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे. पाच जुलै ते 11 जुलैदरम्यान रॅलीचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. सैन्यदलाच्या माध्यमातून देशसेवेची संधी मिळणार आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत अधिकाधिक तरुणांनी अर्ज करीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.

नागपूर येथील सैन्यदल भरती केंद्राचे कर्नल आर. जगथ नारायण यांनीही यावेळी भरती प्रक्रियेविषयीची माहिती दिली. गेल्यावर्षी नागपूर जिल्ह्यात झालेल्या भरतीमध्ये साठ हजार तरुण सहभागी झाले होते. यापैकी सुमारे एक हजार युवकांची अग्निवीर भरतीमध्ये निवड करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यंदाच्या भरतीसाठी आतापर्यंत सुमारे पाच हजार तरुणांनी नाव नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

जॉईन इंडियन आर्मी संकेतस्थळावर अर्ज कसा करावा याबाबत व्हिडीओ आहे तो काळजीपूर्वक पहावा व त्यानुसारच अर्ज करावा. त्याचप्रमाणे पदनिहाय प्रश्नपत्रिकांचे नमुने सुद्धा या संकेतस्थळावर दिलेले आहेत याचा उपयोग अभ्यासासाठी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. युवक युवती अर्ज करण्यासाठी नागपूर येथील सैन्यदल भरती केंद्रात आल्यास त्यांना अर्ज भरण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन असून यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही असे ते म्हणाले. तरूणांनी कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.

विदर्भातील सर्व जिल्ह्यातील (बुलढाणा वगळून) जास्तीत जास्त युवकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा व आपली ऑनलाईन नाव नोंदणी वेळेच्या आत करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.