अदानीच्या प्रश्नावर निरुत्तर भाजपचे राहुल गांधींविरूद्ध सुडाचे राजकारण

0
25

दडपशाहीचा वापर करून लोकशाहीची हत्त्या करण्याचा प्रयत्न

आमदार सहसराम कोरोटे यांचा पत्रकार परिषदेत आरोप

देवरी,दि.०१- भारत जोडो यात्रेला मिळालेला अभूतपूर्व पाठिंबा आणि अदानी-मोदी संबंधांवर निरुत्तर झालेल्या केंद्रातील भाजप सरकारने प्रचंड गोंधळ घालत संसदीय कामकाज बंद पाडले. प्रश्नांचे उत्तर देणे शक्य नसल्याने एक किरकोळ प्रकरण उरकून काढत अवघ्या ९ दिवसात राहुल गांधीना शिक्षा सुनावण्यात आली. प्रकरण एवढ्यावरच न थांबता तत्काळ त्यांची खासदारकी सुद्धा काढून टाकण्यात क्षणाचाही विलंब केला नाही. एवढेच नव्हे तर ज्या गांधी घराण्याने आपली अब्जावधीची संपत्ती राष्ट्राला समर्पित केली, त्या गांधी कुटुंबाच्या एकुलत्या वारसाला आणि उत्तम नेतृत्वगुण असलेल्या राहूल गांधी यांना प्रभावाने बेघर करण्याचे महापाप मोदी सरकारने केले. भाजपचा हा कुटिल डाव कॉंग्रेसपक्षासह देशातील जनता उखडून फेकणार, असे प्रतिपादन देवरी आमगाव विधान सभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी काल दि. ०१ रोजी केले.

राहुल गांधी यांनी संसदेत अदानी घोटाळा संदर्भात प्रश्न अनेक प्रश्न विचारले. अदानी उद्योग समूहात गुंतवलेला शेल कंपनीचे २० हजार कोटी रुपये कोणाचे आणि यात सहभागी असलेल्या चिनी नागरिकाचाही संबंध काय?. हा चिनी नागरिक कोण आहे? यात गौतम अदानी व नरेंद्र मोदी यांचा काय हितसंबंध आहे. तसेच देशातील विमानतळ, संरक्षण क्षेत्र व ऊर्जा क्षेत्रात मोदी सरकारने अदानीला कशी काय मदत केली. सोबतच ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेश दौऱ्यात पंतप्रधान  मोदींनी अदानीला सोबत घेवून गेले व तेथील कंत्राट देण्यासाठी दबाव आणला. यांचे सर्व कागदपत्रांसह पुरावे राहुल गांधी यांनी दिले.

या राहुल गांधींच्या प्रश्नांना संसदेत उत्तर देणे शक्य नसल्याने केंद्र सरकारची पूर्णतः त्रेधा उडाली. परिणामी, इंग्लंडमध्ये केलेल्या विधानाची मोडतोड करून राहूल गांधींनी देशाचा अपमान केला अशी आवई उठवून उत्तरे देणे टाळण्यासाठी मार्ग शोधला. प्रश्न अंगलट येत असल्याचे पाहून गुजरातच्या एका न्यायालयात त्यांच्याच एका नेत्याने दाखल केलेली आणि सध्या स्थगन असलेली केस उरकून काढत अवघ्या ९ दिवसात निकाली काढत त्यांची खासदारकी हिसकावून घेतली. एवढेच नव्हे तर ते राहत असलेले शासकीय निवासस्थान तत्काळ रिकामे करून घेण्याची प्रक्रिया सुद्धा केली. यावरून हे सरकार किती घाबरलेले आहे, हे स्पष्ट होत असल्याचे सुद्धा आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे.

आमदार कोरोटे पुढे म्हणाले की, या देशात प्रचंड वाढलेल्या महागाई आणि बेरोजगारी याच्याशी सरकारचे काही देणेघेणे नसल्याप्रमाणे सरकार वागत आहे. केवळ विरोधकांना नामोहरम करण्यासाठी हातात असलेल्या शासकीय यंत्रणांचा सूडबुद्धीने वापर केला जात आहे

जगातील नामांकित अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठातून उच्च पदव्या राहूल गांधी यांनी घेतल्या आहेत. अशा व्यक्तीला घाणेरडे राजकारण करीत काही निवडक प्रसारमाध्यमांना हाताशी धरून बदनाम करण्याचे कटकारस्थान केले जात आहे.यापासून जनतेने सावध असले पाहिजे, असे ही कोरोटे म्हणाले

या देशात व्यक्ती विशेषला प्राधान्य देण्यात येत आहे. दोन चार उद्योगपतींच्या हातात हा देश सोपवून द्यायचा का ?  यामध्ये सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे मोठे हाल-बेहाल होतील. या ठी राहुल गांधी संसदेत व संसदेच्या बाहेर आवाज उचलत आहेत. राहुल गांधी यांच्या मते देशातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाले पाहिजे आणि हा देश वाचला पाहिजे. काही विशिष्ट लोकांच्या हातात हा देश जाऊ नये, ही राहुल गांधी यांची महत्वाची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.

या पत्रकार परिषेदेत काँग्रेसचे देवरी तालुका अध्यक्ष संदीप भाटिया, माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया, प्रल्हाद सलामे, नगरसेवक सरबजीत सिंग भाटिया(शंकी), सुनीता शाहू, शकील कुरेशी, दीपक(राजा) कोरोटे, अमित तरजुले यांच्यासह देवरी शहरातील पत्रकार व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.