“न्यायपालिकासुद्धा सरकारच्या दबावात”,- काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे

0
7

भंडारा : “खासदार राहुल गांधी यांनी सरकारची दुखणारी नस पकडली. त्यामुळेच कोंडीत सापडलेल्या सरकारने त्यांच्यावर सूडबुद्धीतून कारवाई केली आहे. या प्रकारानंतर न्यायपालिकाही सरकारच्या दबावात असल्याचे दिसून येते. मात्र, वास्तव लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने आणि लोकशाही व देश वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने लढा शेवटपर्यंत सुरू राहील”, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री बोरकर, जिल्हा प्रभारी नंदा पराते, प्रेमसागर गणवीर, उपस्थित होत्या.

आमचा न्यायपालिकेवर विश्वास आहे. मात्र, सध्या न्यायपालिका सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचे गावंडे म्हणाले. राहुल गांधी यांनी सभागृहात अदानी आणि मोदींचा संबंध काय? असा प्रश्न विचारला. अदानींच्या कंपनीला वीस हजार कोटी रुपये कुणी दिले? हे स्पष्ट व्हावे, तसेच संयुक्त संसदीय मंडळ बसवावे यासाठी आग्रह धरणाऱ्या राहूल गांधी यांना शेवटपर्यंत सभागृहात बोलू दिले नाही. याउलट सभागृहात राहुल गांधी जे काही बोलले तेसुद्धा सभागृहातील सीसीटीव्हीमधून डिलीट करण्यात आले. राहुल गांधी सरकारचा भांडाफोड करतील याची धास्ती घेत अखेर जुने प्रकरण उकरून काढले गेले. न्यायालयानेही अत्यंत तत्परता दाखवत निकाल देत राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. दुसरीकडे खासदारकी रद्द करून सभागृहात होणाऱ्या विषयांवर पडदा पडण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. ही सरकारची मुस्कटदाबी असल्याचे गावंडे म्हणाले.