22.9 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home राजकीय खारगर प्रकरणात सरकार आकडे लपवतेय,सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा-आमदार वंजारी

खारगर प्रकरणात सरकार आकडे लपवतेय,सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा-आमदार वंजारी

0
31

गोंदिया,दि.24- ज्येष्ठ निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी खारघर येथे १६ एप्रिल रोजी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. परंतु, आयोजकांनी लोकांच्या जिवांची पर्वा न करता ढिसाळ नियोजन केले. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे सदर प्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे प्रतिपादन विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद व गोंदिया जिल्हा प्रभारी आमदार अभिजित वंजारी यांनी स्थानिय विश्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

खारघर येथील सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित राहून केवळ शक्ती प्रदर्शन केले. परंतु, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्यांची कुठलीच व्यवस्था केली नाही. परिणामी उन्हामुळे जवळपास पन्नासपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारने उत्तर देण्यासाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे आणि याप्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार वंजारी यांनी केली.

राज्यकर्ते या दुर्घटनेची जवाबदारी श्रीसेवकांवर ढकलत असून या कार्यक्रमावर शासनाने तब्बल १३ कोटी रुपये खर्च केले. व्यासपीठावर असलेल्या नेत्यांची व्हीआयपी पद्धतीने बडदास्त ठेवण्यात आली. एसी, कुलर असा सारा थाट होता. मात्र, लाखो सेवकांसाठी साधे शामियाने, पेयजलाचीसुद्धा व्यवस्था का करण्यात आली नाही? हा आमचा सवाल आहे. कार्यक्रम सुरू असताना अनेक सेवक तडफडून मेले, अनेकांना भोवळ आली. त्यांना रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात नेत असतांनाही नेत्यांची भाषणबाजी सुरूच होती, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. हा शासकीय सोहळा राजभवनात आयोजित करण्याऐवजी बेजवाबदरपणे उघड्यावर घेण्यात आला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये शेकडो सेवक जायबंदी झाले. मुळात राज्यकर्त्यांनी कार्यक्रम राजकीय करून टाकला. आताही शासन चौदाचजणांचा मृत्यू झाल्याचे सांगून खरे आकडे दडवीत आहे. यामुळे नैतिक जवाबदारी स्वीकारून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वंजारी यांनी केली.यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड,प्रदेश सचिव अमर वराडे,पी.जी.कटरे,जिल्हा परिषद सदस्य वंदना काळे,विमल कटरे,छाया नागपूरे,उषा शहारे,शहर अध्यक्ष जमीर अहमद,गोरेगाव तालुकाध्यक्ष डेमेंद्र रहागंडाले,निलम हलमारे ,देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटीया,बाबा बागडे,राजू काळे,गौरव बिसने आदींची उपस्थिती होती.