भाजपचे एक खासदार व तीन आमदारांचा पराभव
वर्धा :बाजार समितीच्या आज झालेल्या निवडणूकीत वर्धा, सेलू व देवळी बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून भाजपचा मात्र पराभव झाला आहे. सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वात या आघाडीने मजल मारली असून देशमुख यांचे चिरंजीव डॉ.संदीप देशमुख यांनी सर्वप्रथम विजय नोंदविला. वर्धा बाजार समितीत १८ पैकी १० जागांवर आघाडीचे उमेद्वार विजयाच्या टप्यात असून उर्वरीत जागांवरसुध्दा आघाडीचे उमेद्वार घौडदौड करीत आहे.
सेलू बाजार समितीत १८ पैकी १५ जागांवर आघाडीचे उमेद्वार निवडून आले आहे. या ठिकाणी प्रा.देशमुख, काँग्रेसचे शेखर शेंडे व शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देवतारे यांच्या संयुक्त आघडीने बाजी मारली. देवळीत महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून आले. अठरा पैकी सोळा जागांवर निवडून आले असून दोन अविरोध जागा याच आघाडीकडे आहेत. या तीनही ठिकाणी भाजपचे खासदार रामदास तडस व आमदार डॉ.पंकज भोयर यांनी ताकद लावली होती.पण मतदारांनी त्यांना नाकारले आहे.
सेलू बाजार समितीत भाजपचे खासदार रामदास तडस व आमदार डॉ.पंकज भाेयर तसेच समीर कुणावार यांनी शड्डू ठोकून निवडणूकीत उडी घेतली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, काँग्रेसचे शेखर शेंडे व शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देवतारे यांनी संयुक्त लढा दिला.
काँग्रेसचेच आमदार असलेले रणजीत कांबळे यांनी आघाडीला साथ न देता त्यांच्या जयस्वाल गटाला भाजपच्या पंगतीत बसवले. त्यामुळे ही लढाई फार निकराची झाली होती. हा भाग भाजप आमदार भोयर यांच्यासाेबतच समीर कुणावार यांच्याही क्षेत्रात मोडतो. एक खासदार, तीन आमदार विरोधात सत्तेत नसलेले आघडीचे नेते अश्या लढाईत आमदारबहुल पॅनलला धारातीर्थी पडावे लागले आहे.





