उच्चशिक्षितांचा विदारक देखावा ठरला लक्षवेधी; मोदी सरकारच्या ‘त्या’ दाव्याची पोलखोल

0
6

बुलढाणा : वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे आज करण्यात आलेले ‘बिरबलची खिचडी’ आंदोलन हटके आणि लक्षवेधी ठरले. खिचडी व उच्च शिक्षितांच्या बेरोजगारीचा ‘देखावा’ कडक उन्हातही सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला.दरम्यान बेरोजगारीचे विदारक चित्र मांडणारे देखावे आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले. मोदी सरकारने सत्तेवर येताना दिलेले २ हजार कोटी रोजगार म्हणजे बिरबलची ( कधीच न शिजणारी) खिचडी, उच्चशिक्षित शिक्षक केळेवाला, डॉक्टर कचोरीवाला, वकील जिलेबीवाला, अभियंता पकोडेवाला व चायवाला असा जिवंत देखावा लक्षवेधी ठरला. मोदी सरकारच्या राजवटीत सुशिक्षितांचे बेहाल, त्यांच्यावर आलेली दुर्देवी वेळ आणि केंद्र सरकारला २ हजार कोटी रोजगाराच्या घोषनेचा पडलेला विसर हे या देखाव्यातून प्रभावीपणे मांडण्यात आले.

वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव व युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी हे अभिनव आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज गुरुवारी आयोजित आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व बेरोजगार युवक बहुसंख्येने सहभागी झाले. सुशिक्षित ताना रोजगारासाठी मुख्य ठिकाणी भूखंड द्यावे, बेरोजगारांच्या कुटुंबातील किमान एकाला महामंडळातर्फे प्रशिक्षण व कर्ज द्यावे, बेरोजगारांच्या बँकमधील प्रलंबित कर्ज प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, शहरी व ग्रामीण भागातील रहिवासी प्रयोजनाकरिता असलेल्या सरकारी जागांचे भूखंडचे कायम पट्टे करून द्यावे, आर्थिक मागासलेल्या जातीसमूहातील कुटुंबांना घरकूल बांधून द्यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात बाला राऊत, विजय पवार, राहुल वानखेडे, राहुल साळवे, सागर काळे, सुनील अंभोरे, प्रकाश सरकटे, आकाश झिने, सागर गवई, रतन पवार, मुकुंदा इंगळे, प्रकाश सोनोने, समाधान पडघान, अनंता मिसाळ आदी सहभागी झाले.