शेतकऱ्यांनो ! ई-केवायसी करा अन्यथा अनुदान मिळणार नाही-निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण

0
14

 वाशिम, दि. 18: जिल्हयात प्रधानमंत्री किसान निधी योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हयातील 20 हजार 284 लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही. या प्रलंबित लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे. प्रलंबित लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण करण्याबाबत शासनाचे निर्देश आहे. जे लाभार्थी शेतकरी ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण करणार नाही, त्यांना यानंतरच्या अनुदानाचे हप्ते मिळणार नाही. त्यामुळे जिल्हयातील या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतू प्रलंबित लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण करावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांनी केले आहे.

           ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे आधारकार्ड व आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक घेवून जावे. तसेच ज्या लाभार्थ्याच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे आधार कार्ड आणि उपलब्ध असलेला दुसरा मोबाईल क्रमांक घेवून जाणे आवश्यक आहे. याशिवाय स्वत:ही लाभार्थ्याला कोणत्याही अँड्रॉईड मोबाईलवरुनही आधार ई-केवायसी करता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

           लाभार्थ्याने ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी मोड पीएम किसान पोर्टल किंवा मोबाईल ॲपवरुन देखील करता येईल. https://pmkisan.gov.in हे संकेतस्थळ उघडावे. त्यामध्ये फार्मर कॉर्नरला जावून ई-केवायसीवर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक टाकावा. आधार रजिस्टर मोबाईल क्रमांक टाकावा. नंतर गेट ओटीपीवर क्लिक करावे. मोबाईलवर आलेला चारअंकी ओटीपी नंबर टाकावा. नंतर आधार गेट आधार ओटीपीवर क्लिक करावे. मोबाईलवर आलेला सहाअंकी ओटीपी भरावा. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर ई-केवायसी हॅस बीन सक्सेसफुली डन असा संदेश स्क्रिनवर दिसेल. अशाप्रकारे ई-केवायसी अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे ही प्रक्रीया पुर्ण करुन घ्यावी.

          त्याचप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 20 हजार 348 लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खात्यास आधार जोडणी करणे बाकी आहे. या प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे. तसेच गावातील पोस्टमनकडे देखील उपलब्ध आहे. ज्या लाभार्थ्यांचा बँक खात्यास आधार क्रमांक जोडणे बाकी असेल अशा लाभार्थ्यांनी गावातील पोस्टमनकडे आधार कार्ड घेवून जावे. आपल्या बँक खात्याला आधार सिडींग जोडणी पूर्ण करावी. तसेच ज्या लाभार्थ्यांचे पोस्ट कार्यालयात खाते नसेल अशा लाभार्थ्यांनी तात्काळ बँक खाते उघडावे. जेणेकरुन पुढील लाभ सुरळीतपणे बँक खात्यात जमा होईल.

          वरीलप्रमाणे ई-केवायसी आणि बँक खात्यास आधार क्रमांकाची जोडणी या दोन्ही प्रक्रीया पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना या नंतरच्या अनुदानाचे हप्ते मिळणार नाही. त्यामुळे जिल्हयातील प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जावून आपल्या आधार कार्डची ई-केवायसी तसेच बँकेत जावून बँक खात्यास आधार क्रमांकाची जोडणी प्रक्रीया पुर्ण करावी. असे आवाहन देखील निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांनी केले आहे.