महाजनसंपर्क अभियान यशस्वी करा : केशवराव मानकर

0
21

गोंदिया-देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळाला ९ वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाद्वारे महाजनसंपर्क अभियान ३० मे ते ३० जूनपर्यंत राबविण्यात येत आहे. या महिनाभराच्या कार्यक्रमात पक्षातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन महाजनसंपर्क अभियान यशस्वी करावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी केले.
स्थानिक अग्रसेन भवनात २५ मे रोजी आयोजित भाजपच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. विजय रहांगडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ. हेमंत पटले, गोपालदास अग्रवाल, भेरसिंग नागपुरे, रमेश कुथे, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, विजय शिवणकर, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिप सभापती सविता पुराम, भंडारा गोंदिया संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, जनता सहकारी बँक अध्यक्ष दिनेश दादरीवाल, जिल्हा महामंत्री संजय कुळकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, अ‍ॅड. येसूलाल उपराडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे आदी उपस्थित होते.  पुढे बोलताना मानकर म्हणाले, महाजनसंपर्क अभियान हे बुथस्तरापर्यंत घ्यायचे असून यात लाभार्थी संमेलन, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, व्यापारी संमेलन, विकासतिर्थ दर्शन, जनसभा, प्रबृद्ध नागरिक सभा, प्रसार माध्यम प्रतिनिधी, समाज माध्यम इन्फ्लुएंझर आदी समाजातील मान्यवरांसोबत बैठका, सभा, मेळावे, सादरीकरणातून सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचविली जाणार आहे. दरम्यान, २५ जून रोजी आणिबाणी दिवस व मन की बात, २३ जून रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृतिप्रित्यर्थ बलीदान दिवस कार्यक्रम घेण्यात येणार असून १ जून ते २३ जूनपर्यंत घर घर संपर्क अभियान असणार आहे. पंतप्रधान मोदीजींच्या ३० जून रोजीच्या कार्यक्रमातून या अभियानाचा आरंभ होणार आहे, अशी माहिती केशवराव मानकर यांनी यावेळी दिली. तसेच भाजप-सेना युतीचा अभिनंदन प्रस्ताव त्यांनी ठेवला व तो मंजूर करण्यात आला. आ. विजय रहांगडाले म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण विश्वात देशाचा गौरव वाढविला आहे. जी २० चे अध्यक्षपद आज भारताकडे आहे. ही महत्वाची बाब आहे. २०२४ हे निवडणुकीचे वर्ष असून केंद्र व राज्य सरकारच्या योजना व निर्णय लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे सांगून केन्द्र सरकारचा धन्यवाद प्रस्ताव मांडला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मानकर यांनी, पक्षविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नसल्याचे सांगून नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई करणाºया कार्यकर्त्यांना नोटीस पाठविण्यात येत असून सात दिवसात त्यांचे स्पष्टीकरण न आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सभापती व उपसभापतीपदी निवड झालेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. आमगावचे सभापती केशवराव मानकर, देवरीचे प्रमोद संगीडवार व तिरोडा येथील सभापतींचे अभिनंदन करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे यांची भाजपा प्रदेश महिला मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, भंडारा गोंदिया संपर्क प्रमुख वीरेंद्र अंजनकर यानी सर्व मंडळाचा आढावा घेत महाजनसंपर्क अभियानातील विविध कार्यक्रम प्रमुखांची घोषणा केली. सभेचे संचालन जिल्हा महामंत्री मदन पटले यांनी केले. आभार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला यांनी मानले. सभेला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.