राष्ट्रवादीने अमरावती वरील हक्क सोडावा,काँग्रेसकडेच सक्षम उमेदवार:प्रदेश काँग्रेस प्रवक्ता दिलीप एडतकर

0
8

अमरावती दि.२७-अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार निवडून आल्यामुळे या दोन पक्षांपैकी एकाचा उमेदवारीवर हक्क असून काँग्रेसकडेच सक्षम आणि शंभर टक्के शुद्ध दलित उमेदवार असल्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार असल्याचा ठाम विश्वास प्रदेश काँग्रेस प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी व्यक्त केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात आपलाच उमेदवार असावा असे महाविकास आघाडीतल्या सर्वच घटकांना वाटणे स्वाभाविक असले तरी या मतदारसंघात केवळ आणि केवळ काँग्रेसकडेच सक्षम उमेदवार असल्यामुळे ही जागा काँग्रेसच लढविणार असा विश्वास दिलीप एडतकर यांनी व्यक्त केला आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीने नवनीत राणा नामक अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला होता, काँग्रेस व राष्ट्रवादीला मानणाऱ्या दलित मुस्लिम व बहुजनांनी अपक्ष उमेदवारास मतांचे भरभरून दान दिल्यामुळे अपक्ष उमेदवाराने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी क्रमांक एक व शिवसेना ठाकरे क्रमांक दोनवर होती त्यामुळे या जागेवर आता क्रमांक एक वर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचाच हक्क असून मागील निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीकडे होती ती आता काँग्रेसला मिळावी असा आग्रह काँग्रेस धरणार असल्याचे प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे तीन आमदार असून शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांचा एकही आमदार नसल्यामुळे या दोन्ही पक्षापेक्षा काँग्रेसची ताकद जास्त आहे. त्याचप्रमाणे क्रमांक दोनवर असलेले शिवसेनेचे ठाकरे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आता शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यामुळे शिवसेनेकडे स्थानिक दलीत उमेदवार नाही. काँग्रेस व्यतिरिक्त कोणत्याच पक्षाकडे १००% शुद्ध दलीत व स्थानिक उमेदवार नाही आणि म्हणूनच आपल्या वाट्याला आला म्हणून आयात केलेल्या उमेदवारास महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी दिल्यास तो उमेदवार भाजपच्या विजयाचा शिल्पकार ठरू शकतो असे सांगून काँग्रेस शिवाय अमरावतीला पर्याय नाही असे प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.

अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी जात चोरून निवडणूक लढवल्यामुळे त्यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयात नवनीत राणा यांच्या प्रमाणपत्र प्रकरणास सध्या स्थगनादेश असला तरी त्यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात कोणत्याही क्षणी निर्णय येऊ शकतो आणि त्या निवडणूक लढण्यास अपात्र ठरू शकतात अशा परिस्थितीत केवळ काँग्रेसकडेच सक्षम उमेदवार आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने नाहक हट्ट न करता काँग्रेसकडे अमरावती लोकसभा मतदारसंघ सोपवावा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी या मतदारसंघावरील आपला हक्क सोडावा अशी नम्र मागणी प्रदेश काँग्रेस प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी केली आहे.